
थिबा राजवाडा येथे आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव शनिवारपासून
रत्नागिरी : गेली 15 वर्ष अव्याहतपणे थिबा राजवाडा येथे साकारणारा आर्ट सर्कल आयोजित शास्त्रीय संगीत महोत्सव दि. 21 जानेवापासून सुरू होत आहे. यंदा 21 आणि 22 अशा दोन दिवसांमध्ये रसिकांना हा आनंद लुटता येणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन यशस्वी सरपोतदार यांच्या गायनाने होणार आहे. विदुषी पद्मा तळवलकर यांच्याकडून गेली 12 वर्षे त्या गायनाचे धडे घेत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक मानाच्या महोत्सवांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे. त्यांना पैंगणकर पुरस्कार, छात्र गंधर्व पुरस्कार, आदित्य बिर्ला फाउंडेशनचा कला किरण पुरस्कार, पुलोत्सव सन्मान अशा पुरस्कारांवरही त्यांनी आपले नाव कोरले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप गायन वादन नृत्य या कलांच्या संगमाने होणार आहे. पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला तालचक्र महोत्सवाचा आनंद द्विगुणित करणार आहे. विजय घाटे यांचा तबला, ताकाहिरो आराई यांची संतूर, सुरंजन खंडाळकर यांचे गायन, शीतल कोलवलकर यांचे नृत्य आणि अभिषेक सिनकर यांची संवादिनी यांच्या एकत्रित परिणामाने तालचक्र रसिकांना गुंतवून ठेवतो. प्रत्येक मैफलीचा तोल सांभाळण्याचे काम ताल करतो. अशा या तालांच्या विविध विभ्रमांची माहिती करून देणारा तालचक्र हा एक अनोखा कार्यक्रम आहे.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवसाची म्हणजे दि. 22 ची सुरूवात सुप्रसिद्ध सितारवादक मेहताब अली नियाझी करणार आहेत. सुप्रसिद्ध सितारवादक उस्ताद मोहसीन अली खान यांचे मेहताब हे सुपुत्र. त्यामुळे वडिलांच्या तालमीत वयाच्या चौथ्या वर्षापासूनच मेहताब यांनी सितारीशी दोस्ती केली. आजोबा उस्ताद वझीर अली काद्री हे सुप्रसिद्ध संवादिनी वादक. त्यांच्याकडून मेहताब यांनी भेंडीबाजार घराण्याची गायकीदेखील शिकून घेतली आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी जाहीर कार्यक्रम करण्यास त्यांनी सुरूवात केली. आज ते भेंडी बाजार घराण्याचे अत्यंत आश्वासक वादक म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधून भारताचे प्रतिनिधित्त्वही केले आहे.
दि. 22 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता या महोत्सवाचा समारोप किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याचे दिग्गज गायक पं. व्यंकटेश कुमार करणार आहेत.