रत्नागिरीतील स्फोटात आई-मुलीचा मृत्यू; एकजण गंभीर, दहशतवादी पथक दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगत असणार्‍या उद्यमनगर नजिकच्या शेट्येनगर येथील आशियाना सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, घराच्या भिंतींचे चिरे दुसर्‍या इमारतीवर जाऊन पडले तर स्लॅब पूर्णतः उडाला. या स्फोटाने संपूर्ण शहर बुधवारी पहाटे पाच वाजता हादरले. कोसळलेल्या स्लॅबखाली सापडून माय-लेकींचा जागीच मृत्यू झाला तर वडील-मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की 500 मीटर परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या तर तब्बल दोन ते तीन किलोमीटर लांब या स्फोटाचा आवाज ऐकू आला. अशफाक काझी यांच्या मालकीच्या चाळीतील पहिल्या मजल्यावर घर आहे. बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ते उठल्यानंतर त्यांनी लाईटचा स्वीच ऑन करताच हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज  तीन किलोमीटर परिसरात ऐकू गेला. अश्फाक काझी यांची पत्नी व सासू यांचा जागीच मृत्यू झाला तर अशफाक काझी व त्यांचा मुलगा जखमी झाले.
शेट्येनगरमधील सर्वच रहिवाशांची पळापळ झाली. त्यांनी झोपेतच मिळेल तिकडे धाव घेतली.  या दुर्घटनेत स्लॅब अंगावर कोसळल्यामुळे अशफाक काझी यांची पत्नी कनिज काझी तसेच सासू नुरूनिस्सा अलजी या स्लॅबखाली अडकल्या होत्या. क्रेनच्या सहाय्याने स्लॅब बाजूला करून तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर गंभीर भाजलेल्या अश्फाक काझी व जखमी झालेला त्यांचा मुलगा अमार काझी यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. अशफाक काझी यांची सासू नुरुनिस्सा अलजी या संगमेश्वर येथून आपल्या मुलीला भेटण्यासाठी रत्नागिरीत आल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी आतील सर्व गॅस सिलेंडरच्या टाक्या सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. अशफाक काझी यांनी पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार सिलेंडरमधून लिकेज झालेला गॅस रुममध्ये पसरला होता. आपण लाईटचा स्वीच ऑन केल्यानंतर गॅसचा स्फोट झाल्याची माहिती दिली. रत्नागिरी नगर पालिकेचा अग्नीशमन बंब, एमआयडीसी अग्नीशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती व नागरिकांसह मदतीला त्यांनी सुरुवात केली. सायंकाळी 5 वाजता स्फोटामुळे धोकादायक झालेल्या स्लॅब तोडण्याचे काम शिरगाव ग्रामपंचायतीने हाती घेतले होते. वीजपुरवठाही सायंकाळपर्यंत खंडीत करण्यात आला होता. हा स्फोट नेमका कशाचा झाला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. घरमालक अशफाक काझी यांनी सिलिंडर लिकेज झाल्याने गॅसचा स्फोट झाल्याचे पोलिसांना सांगितले. कोल्हापूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनी घटनास्थळाचे नमुने घेतले आहेत तर नवी मुंबईतून दहशतवादविरोधी पथक रत्नागिरीत दाखल झाले आहे.
अश्फाक काझी हे गंभीर जखमी झाले असून 85 टक्के भाजल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. तर त्यांच्या मुलाच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. मुलगा 10 टक्के भाजला असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने हा स्फोट सिलेंडर व्यतिरिक्त अन्य स्फोटकांचा झाला असावा का? हे शोधण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक नवी मुंबई यांना पाचारण केले होते. दुपारी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदिकराव पोळ यांनी स्फोट झालेल्या खोलीची पाहणी करून तपास सुरू केला आहे. परंतु दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासातून नेमके काय निष्पन्न होते हे लवकरच समजेल. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button