भावकीतील वादातून तो तिला संपवण्यासाठी कॉलेजहून येणार्या आडवाटेवर दबा धरून बसला होता…ती येताच त्याने तिच्यावर दांडक्याने जोरदार प्रहार केला… मात्र मैत्रीण वाचवायला मध्ये आली, पण मैत्रिणीलाच स्वत:चा जीव गमवावा लागला
राजापूर : तालुक्यातील भालावली येथे हादरवून टाकणारी घटना घडली आहे. कॉलेजमधून घरी जाणार्या दोन तरुणींवर गावातील जमीन तसेच भावकीतील वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात मैत्रीणीला वाचवण्यासाठी गेलेली 22 वर्षाची तरूणी मृत्युमुखी पडली. 55 वर्षाच्या प्रौढाने एका मुलीवर दांडक्याने प्रहार केला. मात्र तिला सोडवण्यासाठी मध्ये दुसरी तरूणी गेली. सोडवण्यासाठी गेलेल्या मैत्रीणीचा गळा आवळून तिला ठार मारणार्या संशयित हल्लेखोराला नाटे सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील हल्ला झालेल्या दुसर्या तरुणीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सिद्धी संजय गुरव (22) आणि साक्षी मुकुंद गुरव (21) या दोघी भालवली वरची गुरववाडी येथील रहिवासी असून, भालावली सिनिअर कॉलेज धारतळे येथे शिकत होत्या. महाविद्यालय सुटल्यानंतर 11 वाजता नेहमीप्रमाणे दोघी नेहमीच्याच आडवाटेने घरी निघाल्या होत्या. याच वाटेवर संशयित आरोपी विनायक शंकर गुरव (55, रा. वरची गुरववाडी) हा दबा धरून बसला होता. त्याने सिद्धीला समोरून येताना पाहिले आणि तिच्यावर दांडक्याने हल्ला केला. यात घाबरून गेलेल्या सिद्धीला वाचवण्यासाठी साक्षी पुढे आली. साक्षी ही मध्ये आल्यानंतर विनायकने साक्षीवर दांडक्याने हल्ला केला व तिचा गळा आवळला.
याचदरम्यान सिद्धीने तिथूनच मोबाईलवरून घरी संपर्क केला आणि झालेली घटना सांगितली. तोपर्यंत विनायक तिथून पळून गेला होता. हल्ल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी नाटे पोलिसांना माहिती दिली. या हल्ल्यात साक्षी जागीच गतप्राण झाली होती तर सिद्धी गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी विनायक गुरव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे घटनास्थळी दाखल झाले.