
खासदार नीलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा; आमदार राजन साळवींचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात असंस्कृत व असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उपनेते राजन साळवी व पदाधिकार्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतची चित्रफित या निवेदनासोबत पोलिसांना देण्यात आली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आमच्या नेत्यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवारी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.