शिंदे गट, भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली, तरीही ठाकरे गटाने निवडणूक जिंकली; लांजात आ. साळवींचा जल्लोष

लांजा : तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या शिव सहकार पॅनेलने 17 पैकी 15 जागांवर विजय संपादन केला. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट यांच्या सर्वपक्षीय सहकार पॅनलला पराजित व्हावे लागले. या सहकार पॅनेलने अवघ्या दोन जागा जिंकल्या. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिंदे गटांनी एकत्र येत सहकार पॅनलच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाच्या शिव सहकार पॅनेलसमोर आव्हान निर्माण केले होते. मतदारांनी शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने कौल देत 17 पैकी 15 जागांवर शिवसहकार पॅनेलला विजय मिळवून दिला आहे. खरेदी विक्री संघाच्या एकूण 17 जागांपैकी संस्था मतदार संघातील दहा जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिव सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व 10 जागांवर विजय संपादन केला. संस्था प्रतिनिधी मतदार संघातून निवडून आलेले शिव सहकार पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे : सुरेश साळवी (21 मते), चंद्रकांत शिंदे (20 मते), केशव कुपटे (20 मते), महादेव खानविलकर (21 मते), मोहन घडशी (20 मते), परवेश घारे (21 मते), संदीप दळवी (20 मते), सुभाष पवार (20 मते), सुभाष लाखण (20 मते), उमेश तोडणकर (20 मते). व्यक्तिगत सभासद मतदारसंघातून दोन जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. मात्र ठाकरे गटाच्या चंद्रशेखर तेंडुलकर (406 मते) आणि राहुल शिंदे (409 मते) हे दोघेही विजयी झाले. महिला प्रतिनिधी मतदार संघातून दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सायली तोडकरी (500 मते) आणि सर्वपक्षीय सहकार पॅनलच्या धनिता चव्हाण (483 मते) विजय झाल्या. अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघातून ठाकरे गटाचे संतोष बेनकर यांनी (560 मते) घेऊन विजय संपादन केला. इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघातून सर्वपक्षीय सहकार पॅनलच्या गुरूप्रसाद तेली यांनी (504 मते) घेत शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत मणचेकर यांचा पराभव केला. तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रतिनिधी मतदार संघात कडवी लढत झाली. या ठिकाणी शिवसेनेचे शरद चरकरी यांना 484 मते तर सहकार पॅनलच्या महेंद्र शेडे यांना 483 मते मिळाली. एका मताने ठाकरे गटाचे शरद चरकरी हे विजयी झाले. या विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाने जल्लोष केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button