रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचानालयाचा आज १९५ वा वर्धापनदिन

प्रदीर्घ काळ रत्नागिरीच्या इतिहासातील जागृत साक्षीदार, इथल्या सामाजिक, आर्थिक, नैसार्गिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक स्थित्यंतराचे जागते संवेदनशील केंद्र असलेले हे वाचनालय.
अनेक नररत्नांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू विकसित करण्यासाठी ग्रंथ साधना उपलब्ध करून देणारे हक्काचे ठिकाण म्हणजे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते विकसित भारतमातेच्या प्रत्येक स्पंदनाशी जोडलेले रत्नागिरीशी अतूट नाते निर्माण केलेले हे वाचनालय. रत्नागिरीच्या नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील भीष्माचार्य असलेली संस्था म्हणजे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय. अठराव्या शतकातील दुर्मिळ ग्रंथसंपदा, 19 व्या शतकातील व विसाव्या शतकातील ग्रंथसंपदा आपल्या कुशीत अलगदपणे जपून ठेवणारी जननी म्हणजे हे पुरातन वाचनालय. माझ्या माहितीप्रमाणे या वाचनालयात आज अखेर 3000 च्या आसपास दुर्मिळ ग्रंथसंपदा आहे. दुर्मिळ म्हणजे ही ग्रंथसंपदा कदाचित फक्त आणि फक्त याच वाचन मंदिरात उपलब्ध असेल. इतके पुरातन असलेले हे वाचनालय एक लाख 11 हजार ग्रंथांनी सजलेले आहे. अनेक प्रकारचे कोश, विविध साहित्य प्रकार, आत्मचरित्र, ऐतिहासिक ग्रंथ ,पुरातन हिंदू ग्रंथ, वेद, उपनिषदं, नवनवीन साहित्य, प्रवासवर्णने, काव्यसंग्रह, साडेतीन हजारच्या आसपास असलेली नाटके, अनेक वाचकप्रिय कादंबऱ्या अशा विविध साहित्य प्रकारातील ग्रंथांनी या वाचनालयाची शान आणि वैभव अखंड जपले आहे.
द्विशताब्दीकडे वाटचाल करणारे नव्हे दिशताब्दीच्या उंबरठ्यावर उभे असलेले, रत्नागिरीच्या सुसंस्कृत, उन्नत ,शालिन अशा वाटचालीचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेले वाचनालय म्हणजे रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय.
जिथे उत्तम वाचनालय आहे अशा नगरीचे ‘सुसंस्कृत नगरी’ असे वर्णन अनेकांनी केले आहे. हा सुसंस्कृत नगरीचा गौरव रत्नागिरी नगरीला प्राप्त आहे.
गेली 25 वर्ष या वाचनालयाशी नव्हे या वाचनालयाच्या प्रत्येक स्पंदनाशी मी जोडला गेलो आहे. या वाचनालयात कार्यभार स्वीकारून याच वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. 25 वर्षाचा या कार्यकाळात पुरातन वाचनालयाला अद्यावत वाचनालय म्हणून प्रस्तुत करण्यात यश आलं. वाचनालयाच्या अर्थकारणाची घडी बसवता आली. सरस्वती आणि लक्ष्मी एकाच ठिकाणी वास करत्या झाल्या ही स्वामी कृपा असावी असे माझे प्रामाणिक मत आहे. या पंचवीस वर्षात ग्रंथसंपदा दुपटीपेक्षा अधिक वाढवता आली. ग्रंथ दालन बहुआयामी साहित्य प्रकारानी ओतप्रत भरण्यामध्ये यश प्राप्त झाले. वाचक संख्या सातत्याने वाढती राहिली. ग्रंथप्रेमी वाचक आणि बहरलेली ग्रंथसंपदा असा दुहेरी संगम सातत्याने या ग्रंथ मंदिराने अनुभवला आहे. या ग्रंथ मंदिरामध्ये ग्रंथसंपदेची उत्तम सुश्रुषा निगा राखली जाते. वाचकाला त्याच्या पसंतीचे ग्रंथ हे त्वरित उपलब्ध व्हावेत यासाठी वाचनालयाचे कर्मचारी जागृतपणे व्यवस्था करत असतात. वाचनतृष्णा भागवण्यासाठी मागणीनुसार तत्काळ ग्रंथ उपलब्ध होणे हा दुग्धशर्करा योग या वाचनालयाच्या वाचकांनी नेहमीच अनुभवला आहे. वाचनालयाचे वाचक आणि ग्रंथसंपदा यांच्यामधील दुवा म्हणून सदैव जागृतपणे हे वाचनालय सेवा देत आले आहे .
या वाचनालयाने अनेक हिंदोळे, चढ उतार अनुभवले आहेत. अनेक स्थित्यंतरे लिलया पचवली आहेत. मात्र ग्रंथसंपदा आणि वाचक वर्ग यांच्या मिलनाचा दुवा म्हणून हे वाचनालय सदैव आनंदाने स्वागतासाठी सज्ज राहिले आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये ग्रंथसंपदेच्या वृद्धीबरोबरच अनेक साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम प्रचंड श्रोतृवर्गाच्या उपस्थितीत नियमितपणे आयोजित करताना या वाचनालयाला मनस्वी आनंद झाला असेल. व्याख्याने ,परिसंवाद, गायन वादन, नृत्य, मुलाखती असे विविध प्रकार घेऊन वाचनालयाने श्रोतृवर्गाच्या अपेक्षांना साजेसे काम केले आहे.
हे वाचनालय महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय समजले जाते. कालौघा मध्ये अनेक संदर्भ जतन न केल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मात्र वाचनालयाची उपलब्ध असलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा या नव्या युगात डिजिटल माध्यमातून आजीवन उपलब्ध राहावी यासाठी महत्त्वाकांक्षी डिजिटलायझेशनचा उपक्रम हाती घेत आहोत. या साठी प्रत्येक रत्नागिरीकर नागरिकाचे आर्थिक सहकार्य अपेक्षित आहे.येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातली सर्वात जुने असलेले हे रत्नागिरीचे वैभव डिजिटल वाचनालय म्हणून जगतासमोर आणण्याचा प्रयत्न आहे.
या वाचनालयामध्ये अनेक धुरिणींनी आपल्या सेवा वेळोवेळी दिल्या आहेत. वाचनालयाची सेवा करण्याचे हे व्रत 25 वर्ष अखंडपणे करण्याचे भाग्य मला मिळाले. हे व्रत रत्नागिरीकर अशाच व्रतस्थ भूमिकेतून सदैव प्रवाही ठेवतील व रत्नागिरीचे वैभव ठरलेले हे ऐतिहासिक वाचनालय अनेक शतके ग्रंथसंपदेचे जतन करत वाचन संस्कृती वृद्धिंगत करत पुढे जाईल हा विश्वास आहे. तंत्रज्ञानाच्या या नव्या युगातही नवयुवकांना, विद्यार्थ्यांना आपल्या ग्रंथसंपदेने आकर्षून घेऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे, ग्रंथांच्या माध्यमातून सुसंस्कार करण्याचे आपले कार्य रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय अव्याहातपणे सुरू ठेवेल याबाबत कोणताही संदेह नाही.
रत्नागिरीतील सर्व सुसंस्कृत नागरिकांनी वाचन प्रेमींनी आवर्जून या 195 वर्षाच्या वाचनालयाचे वाचक सभासद व्हावे. या ऐतिहासिक वाचनालया बरोबर आपले नाते जोडवे व येथील ग्रंथसंपदेचा आस्वाद घ्यावा हीच मनोमन इच्छा हे पुरातन वाचनालय आजच्या वर्धापनदिनी व्यक्त करत असेल. या वाचनालयाला शुभेच्छा देताना ‘वाचन संस्कृतीला चालना देणारे, दुर्मिळ ग्रंथांचे संकलन-जतन करणारे हे वाचनालय, सदैव उत्तम वाचकांच्या वरदळीचे केंद्र राहावे’ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व वाचक, नगर वाचनालयाशी संबंधित आजी-माजी सर्व सदस्य , सेवाभावी कर्मचारी या सर्वांना वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला
ॲड. दीपक पटवर्धन
अध्यक्ष रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button