मुंबई विद्यापीठास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत राजापूरचा प्रणय चोरगे प्रथम
राजापूर : तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या प्रणय चोरगे या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठास्तरीय पनवेल येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये 60 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून अशा स्पर्धेसाठी निवड झालेला प्रणय हा मराठे महाविद्यालयाचा पहिला विद्यार्थी आहे. तर हौशी शरीरसौष्ठव संघटनेतर्फे घेण्यात येणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीही त्याची किशोर गटातून निवड झाली आहे.
राजापूर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेला प्रणय सध्या विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये शिकत आहे. लहानपणापासून व्यायामाची आवड होती. मात्र, खर्या अर्थाने दहावीनंतर व्यायामाला सुरूवात केल्याचे प्रणय सांगतो. त्याच्यातून त्याने आरएसपीएमएस, राजापूर या व्यायामशाळेतून सरावाला सुरूवात केली. शरीरसौष्ठवमधील आदर्श आणि गुरूवर्य सत्यवान लोळगे, हर्षद मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सराव करून विविध स्पर्धांमध्ये सुयश संपादन केल्याचे तो सांगतो. किशोर गटातून त्याने जिल्हा, राज्यस्तरावर विविध पदकांची लयलूट करीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये धडक मारली आहे.