जगबुडी नदीत आणखी एका महाकाय मगरीचा मृत्यू
खेड : शहराजवळील जगबुडी नदी पात्रात एकाच महिन्यात दोन मगरींचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दि.10 रोजी एक महाकाय मगर नदी पात्रात मृतावस्थेत आढळून आली आहे. या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु निसर्गप्रेमींनी या घटनेनंतर चिंता व्यक्त केली आहे.
खेडमधील जगबुडी नदी प्रदूषित झाली आहे. शहराजवळ संथ वाहणार्या या नदीत हजारो टन कचरा तरंगताना दिसतो. या नदीतील प्रदूषणाचा फटका येथे अधिवास बनवलेल्या मगरींना बसत असल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्याभरात दोन मगरी मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्यांच्या अस्तित्वाचे संरक्षण होणे आवश्यक आहे.
मंगळवारी नदीपात्रात मृतावस्थेत दिसून आलेल्या मगरीचा पंचनामा करून वन विभागाने नदी पात्रातच मृत मगरीची विल्हेवाट लावली. नदीतील प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. वन विभागाने देखील मगरीच्या मृत्यूची कारणे शोधण्याची गरज असून त्या दृष्टीने पाहणे गरजेचे असल्याचे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.