गणपतीपुळेत हजारो भाविकांनी घेतले दर्शन

रत्नागिरी : सन 2023 या वर्षात अंगारकी चतुर्थीचा एकमेव योग असल्याने दर्शनासाठी हजारो भाविक गणपतीपुळे येथे  मंगळवारी दाखल झाले होते. 70 हजारहून अधिक भाविकांनी गजाननाचे दर्शन घेतले. सायंकाळी होणार्‍या पालखी सोहळ्यालाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गणपतीपुळे समुद्रकिनाराही पर्यटक व भाविकांनी फुलून गेला होता. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचे हाल होऊ नयेत यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायत, संस्थान श्री देव गणपतीपुळे व पोलिस आणि महसूल प्रशासन केलेल्या नियोजनामुळे भाविकांनाही सुलभपणे दर्शन मिळाले. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मुख्य पुजारी अमित घनवटकर व सहकारी ब्राह्मणवृंद यांच्या हस्ते विधीवत पूजा व आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या अंगारकी यात्रा उत्सवासाठी पश्चिम महाराष्ट्रातील भागासह मुुंबई, पुणे येथील गणेश भक्त गणपतीपुळे येथे सोमवारी सायंकाळपासूनच दाखल झाले होते.
गणेशभकतांना व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शनलाईन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीमार्फत आलेल्या वाहनांची सागरदर्शन पार्किंग मध्ये व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या सुरक्षेसाठी आपटातिठा, कोल्हटकर तिठा, मंदिर परिसर, एसटी बसस्थानक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . सुमारे 22 अधिकारी, 175 पोलीस कर्मचारी व 30 राखीव पोलीस दलाचे सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. तसेच दर्शन मार्गिकेमधून गणेशभक्तांना सुलभ दर्शन व्हावे, याकरिता पोलिस कर्मचारी यांच्यासह रत्नागिरी येथील अनिरुद्ध उपासना केंद्राचे सुमारे 50 स्वयंसेवकांनी आपली कामगिरी चोख बजावली.
आलेल्या गणेशभक्तांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास तत्काळ औषधोपचार मिळावेत यासाठी मंदिर परिसरात मालगुंड येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय धारिया , समुदाय अधिकारी डॉ. सय्यद आसिफ, आरोग्यसेवक एम. डी. सातव व कर्मचारी यांचे पथक तैनात करण्यात आले होते.  कोल्हापूर येथील गणेशभक्तांनी श्रींची पालखी हारफुलांनी अतिशय आकर्षकरित्या सजवली होती. सायंकाळी 4.30 ते 5.30 या वेळेत ढोल ताशांच्या गजरात  पालखी प्रदक्षिणा मिरवणूक सोहळा पार पडला.  रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी चंद्रोदय झाल्यानंतर घाटमाथ्यावरील काही गणेश मंडळांनी येथे दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. मेगा स्पीकरद्वारे समुद्राच्या खोल पाण्यात भाविकांनी जाऊ नये, याकरिता योग्य त्या सूचना देण्याचे काम करण्यात आले. तसेच पोलिसांकडून घोड्यावरून किनार्‍यावर गस्त घालण्यात येत होती.
रत्नागिरी बस डेपो यांचे मार्फत भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस फेर्‍या सोडण्यात आल्या होत्या.  रात्री चंद्रोदयानंतर  10 वाजता स्वयंभू श्रींचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button