उद्योगातून रोजगार देताना कोकणात कृषी क्रांती करणारा अवलिया सदानंद उर्फ अप्पा कदम शेतीच्या माध्यमातून शेकडो हाताना काम
दिलीप जाधव-शेतीसारखे सुख नाही, कोकणच्या लाल मातीत सोनं पिकविण्याची क्षमता आहे. मात्र यासाठी कष्ट करण्याची तयारी असायला हवी. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत पाण्याचे योग्य नियोजन केले तर कोकणच्या लाल मातीतून आपण बाराही ही महिने वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊन शकतो हे मुंबईस्थित यशस्वी उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी खेड तालुक्यातील वेरळ येथे वीस एकर जमिनीत पारंपरिक भात शेतीबरोबरच आंबे हळद, केळी, पपई, आलं मिरची, फ्लॉवर, टॉमॅटो , पावटा, घेवडा, चवळी. आदी भरघोष पिके घेऊन दाखवून दिले आहे. वेरळच्या माळरानावर सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी केलेली कृषिक्रांती ही खरोखरच पुढील पिढीसाठी आदर्श ठरणारी आहे.
खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र असलेले सदानंद उर्फ अप्पा कदम हे देखील अन्य युवकांप्रमाणे मुंबईत गेले सुरवातीला त्यांनी मुंबईत मिळेल तिथे नोकरी केली मात्र त्यांचे मन नोकरीत रमत नव्हते. आपले ध्येय हे नोकरी नव्हे तर काहीतरी वेगळे करून दाखवायचे असे त्यांना सतत वाटत असे. अखेर त्यांनी नोकरीला रामराम केला आणि मुंबईतच स्वतःचा केबल व्यवसाय सुरु केला. सचोटी आणि प्रामाणिकपणा यामुळे अल्पावधीतच त्यांनी हा व्यवसाय यशस्वी करत आपल्या उद्योगाच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांनी मुंबईत सुरु केलेला केबल व्यवसाय अतिशय उत्तमपाने सुरु होता.पण कोकणात जाऊन कोकणच्या लाल मातीत शेतीमध्ये काहीतरी वेगळे करायचे, शेतीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करायचा हा विचार त्यांना स्वस्थ बसून देत नव्हता. अखेर २२ वर्षांपूर्वी सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी खेड तालुक्यातील कुडोशी गावच्या हद्दीत जागा खरेदी करून त्या जागेवर अनिकेत फार्म हाऊसची निर्मिती केली आणि खऱ्याअर्थाने शेती व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. या फार्महाऊसमध्ये त्यांनी पारंपरिक भात पिकासह केळी, पपई, आलं भाजीपाला यासह जरबेरा ची शेती केली. आधुनिक शेती अवजारे, पाण्याचे योग्य नियोजन आणि दिवसरात्र स्वतः शेतात केलेली मेहनत यामुळे अल्पावधीतच शेती व्यवसाय चांगलाच बहरला आणि शेतीच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी खेड सारख्या छोट्या तालुक्यात अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला
शेतीपूरक व्यवसायातून आपण अनेक हाताना काम देऊ शकलो या भावनेने सदानंद उर्फ अप्पा कदम हे समाधानी होते मात्र हे समाधान फार काळ टिकले नाही. २००८ साली आलेले फयान आणि त्यानंतर २०१७ मध्ये आलेले आणखी एक वादळ यामध्ये त्यांच्या फार्महाऊसमधील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान साले. केळी, पपईची झाडे उन्मळून पडली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र या संकटांने खचुन न जाता सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी पुन्हा शेतीच्या कामात स्वतःला झोकून दिले. त्यानंतर त्यांनी वेरळ येथे २० एकर जमीन खरेदी केली या जमिनीवर मोठ्या प्रमाणत शेती करण्याच्या निर्धार केला. शेती करायची म्हणजे पाण्याचे योग्य नियोजन हवे हे त्यांच्यातील जातिवंत शेतकऱ्याला माहित असल्याने सगळ्यात आधी त्यांनी या जमिनीत १ कोटी १० लाख पाणी साठवण करण्याची क्षमता असलेले शेततळे खोदले आणि या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडीला सुरवात केली.
या आधी जी पिके कोकणात घेतली जात नव्हती ती पिके घेण्याकडे त्यांचा पहिल्यापासूनच कल होता त्यामुळे त्यांनी सुमारे १० एकरमध्ये आंबे हळदीची लागवड केली. आंबे हळद पिकविण्यासाठी कशाप्रकारे मशागत करावी लागते, कोणत्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागते यासाठी त्यांनी कृषी तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले आज १० एकरच्या परिसरात आंबे हळद बहरली असून लवकरच ही हळद काढली जाणार आहे.
आंबे हळदीप्रमाणे याच जमिनीत त्यांनी ६५०० केळीची आणि ३००० पपईची रोपे लावली आहेत. केळी आणि पपईची देखील योग्य प्रकारे देखभाल केली जात असल्याने केळीची बाग चांगलीच बहरून आली आहे तर पपईच्या झाडांना पपई लगडलेले दिसत आहे. हे सारे पाहताना मनाला अतीव आनंद होत असल्याचे सदानंद कदम अभिमानाने सांगतात.
याच जागेत कदम यांनी आंतरपीक म्हणून पावटा, चवळी, घेवडा ह्या शेंगभाज्याची लागवड केली आहे.आंतर पिकातूनही चांगले उत्पन्न मिळत आहे. सदानंद कदम यांनी केलेली संपूर्ण शेती केवळ सेंद्रिय खतावर पोसली जाते. या मध्ये कुठेही रासायनिक खताचा वापर करण्यात आलेला नाही त्यामुळे या शेतीतील पिकं ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी आहेत. मुंबईतील व्यवसाय सांभाळून सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी कोकणातील लाल मातीत केलेल्या कृषी क्रांतीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतीच्या माध्यमातून आपण अनेकांच्या हाताला काम देऊ शकलो यासारखे दुसरे समाधान नाही असे सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी माध्यमांशी औपचारिक गप्पा मारताना सांगितले.
मुंबई सारख्या शहरात एक यशस्वी उद्योजक असल्याने सर्व सुखं पायाशी लोळण घेत आहेत. मात्र तरीही सदानंद उर्फ अप्पा कदम हे तासंतास शेतात काम करताना दिसतात. कामगार जेव्हा शेतात काम करत असतात तेव्हा सदानंद उर्फ अप्पा कदम हे देखील त्यांच्यातीलच एक होऊन शेतीची मशागत करताना दिसतात. पहाटे ५ वाजता उठल्यापासून रात्री अंथरुणाला पाठ टेकेपर्यत त्यांचा मनात केवळ शेती आणि शेतीचेच विचार असतात. शेतात काम करणाऱ्या कामगारांसोबत काम करताना त्यांना काहीच कमीपणा वाटत नाही हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे . शेतात काम करताना अंगाला माती लागली की मनाला मिळणार आनंद अवर्णीय आहे असे जेव्हा ते सांगतात.तेव्हा त्यांची शेतीबाबतची निष्ठा दिसून येते.
कोरोनाच्या काळात लॉक डाउन मुळे जेव्हा पूर्ण जग थांबले होते तेव्हा सदानंद उर्फ अप्पा कदम हे कामगारांना सोबत घेऊन शेतात काबाडकष्ट करत होते. ऊन, पावसाची तमा न करता त्यांनी शेतात केलेल्या कष्टाचे चीज म्हणून त्या काळात त्यांनी ५० खंडीचे भातपीक घेतले होते. शिवाय आंबा, काजू, चिकू या फळझाडांची लागवड करून त्यातूनही उत्पन्न घेतले होते. यापुढेही उद्योग व्यवसाय सांभाळून कृषी क्षेत्रात येणाऱ्या नवनव्या आधुनिक तंत्रज्ञाच्या साहाय्याने कोकणात मोठ्या प्रमाणत कृषी क्रांती करण्याच्या निर्धार सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी व्यक्त केला आहे.
अतिशय कष्टाने निर्माण केलेल्या उद्योगाला आणि कृषी क्रांतीला बाहेर येत असतानाच सदानंद उर्फ अप्पा कदम याना मानव निर्मित वादळाचा सामना करावा लागतो आहे. खरतर हे वादळ फयान वादळापेक्षाही मनस्ताप देणारे आहे मात्र तरीही या वादळामुळे आपले लक्ष विचलित होऊ न देता किंवा खचूनही ना जाता शेतीसाठीच सर्वकाही या भावनेने ते काम करत करत आहेत. कितीही संकट आली, कितीही मोठे वादळ घोंगावू लागले तरी खचून न जाता आपण आपले काम करत रहावे ही त्यांची वृत्ती म्हणजे तरुणांना एक वेगळा आदर्श आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
सदानंद उर्फ अप्पा कदम यांच्या कृषी क्रांतीला सलाम !