रत्नागिरीच्या किनारपट्टीवर आढळली कासवाची 510 अंडी; 12 ठिकाणी कासव संवर्धन प्रकल्प राबवणार
रत्नागिरी : जिल्ह्यात बारा समुद्रकिनार्यांवर कासव संवर्धन प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चार ठिकाणी 510 अंडी आढळून आली आहेत. वनविभाग व कासवमित्रांनी याचे संवर्धन केले आहे. पुढील पन्नास ते साठ दिवसात यातून पिल्ले बाहेर येती, असा अंदाज वनविभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. वादळांमुळे मागील दोन वर्ष ऑलिव्ह रिडले कासवांच्या वीणीचा हंगाम लांबला होता. परंतु यंदा कासवांच्या विणीचा हंगाम वेळेत सुरू झाला आहे. मंडणगड तालुक्यातील वेळास, रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड व गावखडी तर राजापूर तालुक्यातील वेत्ये व माडबन येथे समुद्रकिनार्यावर प्राणी मित्रांना कासवांनी तयार केलेल्या घरट्यामधून 510 अंडी सापडली आहेत. ही अंडी कासवमित्र व नागरिकांच्या संरक्षणात ठेवण्यात आली आहेत. गावखडी येथे दोन घरट्यांमध्ये 278 कासवाची अंडी सापडली आहेत. माडबन येथे 12 डिसेंबरला 124 अंडी होती. मालगुंड येथे एका घरट्यात कासवांची 108 अंडी होती. बारा किनार्यांवर प्रकल्प राबविले जाणार असून यासाठी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे आणि सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल एन. एस. गावडे, सदानंद घाटगे, प्रभू साबणे, शर्वरी कदम, सुरज तेली यांच्यासह कासव मित्र प्रदीप डिंगणकर आणि ऋषिराज जोशी हे मेहनत घेत आहेत.