आमदार योगेश कदमांच्या कारवर डंपर नेऊन घातपाताचा प्रयत्न : रामदास कदम यांचा आरोप
खेड : आमदार योगेश कदम यांच्या कारला डंपरने ठोकर देऊन झालेला अपघात हा घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोपही रामदास कदम यांनी यावेळी केला. शनिवारी दि.7 रोजी खेड येथे ही पत्रकार परिषद झाली.
पत्रकारांशी बोलताना रामदास कदम म्हणाले, रायगडच्या पोलिस अधीक्षकांकडे घटनेच्या चौकशीची मागणी मी केली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या पुढे व पाठीमागे पोलिसांचे वाहन असतानाही डंपरने पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करून आमदारांच्या गाडीला मागून कसे ठोकरले? हा सर्व प्रकार संशयास्पद वाटतो. या अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. तो अद्याप फरार आहे. दापोली मतदारसंघातील जनता आ. कदम यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे घातपात करणार्यांचा प्रयत्न फसला असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.