
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वयोगटात जिल्ह्यात चार लाखाहून अधिक महिला लाभार्थी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वयोगटात रत्नागिरी जिल्ह्यात चार लाखाहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी होऊ शकणार असून या संभाव्य लाभार्थी महिलांचे अर्ज प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या असल्याने, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील 18 वयाच्या पुढील महिला मतदारांची संख्या पाच लाख 46 हजार 172 आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वयोगटाच्या महिलांची संख्या सुमारे 4 लाख 7 हजार 51 इतकी आहे. ही संख्या संभाव्य महिला लाभार्थ्यांची असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. यामध्ये दापोली-खेड-मंडणगड मध्ये सुमारे 1 लाख 17 हजार 917, गुहागर चिपळूण-खेडमध्ये 1 लाख 1 हजार 23, चिपळूण-संगमेश्वरमध्ये 1 लाख 12 हजार 86, रत्नागिरी-संगमेश्वरमध्ये 1 लाख 19 हजार 687 तर राजापूर-लांजा-साखरपामध्ये 95 हजार 359 संभाव्य महिला लाभार्थी असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत महिला लाभार्थ्यांबाबत अंगणवाडी, आशा, एनआरएचएम विभागाकडूनही माहिती घेतली जात आहे.ही योजना जाहीर झाल्यापासून 236 ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत तर 3 हजार 585 ऑफलाईन अर्ज महिलांनी जमा केले आहेत. पालकमंत्री यांच्या सूचनेप्रमाणे ठिकठिकाणी शिबिरेही आयोजित केली जात आहेत. रत्नागिरीसाठी वीर सावरकर नाट्यगृहामध्ये अर्ज भरुन घेण्यासाठी शनिवार 6 जुलै रोजी विशेष शिबीर आयोजित केले गेले आहे