रत्नागिरीत मच्छीमारांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे; पर्ससीन नेट मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक
रत्नागिरी : तालुका शाश्वत पारंपरिक मच्छीमार संघटनेची महत्त्वाची सभा मिर्या येथील नवीन दत्त मंदिरात झाली. यावेळी मच्छीमार आक्रमक झाले . बंदी आदेश धुडकावून शेकडो पर्ससीन नेट नौका राजरोस मिरकरवाडा बंदरातून बेकायदेशीर मासेमारी करीत आहेत. तसेच एलईडीद्वारे अनधिकृत मासेमारी सुरू आहे. याला पायबंध घालण्यासाठी आता पारंपरिक मच्छीमार या नौकांना पकडून देणार आहेत. ही आक्रमक भूमिका त्यांनी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते. 1 जानेवारी 2023 पासून शासकीय नियमानुसार पर्ससीननेट मासेमारीला पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र शेकडो पर्ससीननेट नौका मिरकरवाडा बंदरात राजरोस सुरू आहेत. अशा नौकांवर स्वतः शाश्वत मच्छीमार संघटना मत्स्य खात्याच्या अधिकार्यांना घेऊन मिरकरवाडा बंदरात कारवाईसाठी जाईल. तसेच एलईडी लावून ज्या पर्ससीन नौका मासेमारी करीत आहेत, अशा नौका मालकांवर शाश्वत मच्छीमार कारवाई करतील, असे यावेळी ठरवण्यात आले.