राजपुतांच्या इतिहासापासून प्रेरणा घ्यायला हवी : हभप चारुदत्त बुवा आफळे

रत्नागिरी : तेराशे वर्षांपासूनचा राजपुतांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यापासून बोध घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी व्यक्त केली.
येथील कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेल्या बाराव्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन स्व. प्रमोद महाजन संकुल मंगळवार दि. 3 जानेवारी सायंकाळी झाले. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डॉ. श्रीधर ठाकूर, रत्नागिरी राजपूत संघाचे डुंगरसिंह राठोड, कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी आणि आफळे बुवा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. हा कीर्तन महोत्सव  शनिवार दि. 7 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
महोत्सवात निरूपण करताना बुवांनी पूर्वरंगात रघुवंशाचे पूर्वज राजा दिलीप यांच्या कार्याचा आढावा घेतला. श्रीरामचंद्राचे वंशज कसे एकवचनी होते, याचे वर्णन बुवांनी केले. उत्तररंगात बुवांनी बाप्पा रावळ यांच्या पराक्रमाचे निरूपण केले. इसवी सन 711 मध्ये यवनांनी भारतावर सर्वप्रथम आक्रमण केले. संपत्तीची लूट करण्याबरोबरच धर्मांतर आणि स्त्रिया-मुलींचे अपहरण, त्यांच्यावर अत्याचाराचे तंत्र मीर कासिमने अवलंबिले. आपण शत्रूच्या सैन्याच्या ताब्यात जायचे नाही, हे ठरवून दाहिराच्या पत्नीने जय हर अशी गर्जना करत मृत्यूला कवटाळले. याच जय हर शब्दप्रयोगाचे पुढे जोहार असे नामांतर झाले.  याच्या पराभवाचा बदला बाप्पा रावळ यांनी घेतला आणि शत्रूला गझनीच्या दारापर्यंत पोहोचविले. सिंधू नदीपासून बगदादपर्यंत ठिकठिकाणी आपल्या चौक्या त्याने लावल्या. सध्याच्या पाकिस्तानात असलेले रावळपिंडी शहर याच बाप्पा रावळच्या स्मृती जपत आहे. नंतर झालेल्या युद्धामध्ये यवनांचा पराभव केल्यानंतर त्यांनी धर्मांतरित केलेल्या मूळ हिंदूंना पुन्हा आपल्या धर्मात घेतले गेले असते, तर पुढच्या काळात वेगळा इतिहास घडला असता, असे सांगितले. बुवांना हेरंब जोगळेकर (तबला), प्रथमेश तारळकर (पखवाज), वरद सोहोनी (ऑर्गन) आणि उदय गोखले (व्हायोलिन) यांनी संगीतसाथ केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button