
‘चला जाणूया नदीला’ अभियानाची चिपळूणमध्ये सुरुवात
चिपळूण : देशाच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ अभियानाची सुरुवात दि.2 रोजी येथील वाशिष्ठी नदी जलपूजनाने झाली. आ. भास्कर जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी पेठमाप येथील भाटण परिसरात वाशिष्ठी किनारी जलपूजन करून रत्नागिरी जिल्ह्यातील अभियानास सुरुवात झाली. विविध कारणांनी नद्यांचे प्रदूषण नागरिकांमुळे वाढले आहे. अशी स्थिती देशभरातील अन्य नद्यांची आहे. परिणामी, चला जाणूया नदीच्या माध्यमातून नदीचे महत्त्व आणि स्वच्छता आणि पुनर्जीवन अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील या अभियानाची सुरुवात आज चिपळुणातील वाशिष्ठी नदी पूजनाने झाली. आमदार भास्कर जाधव यांनी पेठमाप भाटण वाशिष्ठी किनार्यावर नदीची विधीवत पूजा करून श्रीफळ व पुष्प अर्पण करून पूजन केले. त्यानंतर महिलांनी नदीला साडी अर्पण केली.
आ. जाधव यांच्यासह आ. शेखर निकम, माजी आ. सदानंद चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, ठाकरे गटाचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, अभियान समितीचे जिल्हा सदस्य शाहनवाज शाह आदींसह अनेक मान्यवरांनी अभियानाची सुरुवात केली.