
वेळेत मच्छिमारी बोटीची बांधणी केली नाही म्हणून व्यावसायिकाला मारहाण
रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला भाटकरवाडा येथील बोट बांधणी करणार्या व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. श्रीधर वासुदेव भाटकर (५०, रा. भाटकरवाडा, पेठकिल्ला) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी मारहाण प्रकरण अफान खलिल मजगांवकर (रा. राजीवडानाका, रत्नागिरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीधर भाटकर यांचा पेठकिल्ला येथे मच्छिमार बोट बांधणीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे संशयित आरोपी अफान याने बोट बांधणीसाठी दिली होती. ही बोट बांधणीचे काम भाटकर यांच्या कारखान्यात सुरू होते. गणपती सणासाठी कामगार सुट्टीवर गेल्याने बोट बांधणीच्या कामाला उशीर होत होता. श्रीधर यांनी बोट बांधणीचे काम वेळेत पूर्ण केले नाही, याचा राग अफान याच्या मनात धुमसत होता. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ च्या सुमारास श्रीधर हे आपल्या घरामध्ये चहा पित होते. यावेळी अफान हा लोखंडी पाईप घेवून श्रीधर यांच्या घरामध्ये शिरला. तसेच श्रीधर यांच्या पायावर, पोटावर पाईपने मारहा केली.
यावेळी मोठा आरडाओरडा झाल्याने आजुबाजूच्या परिसरातील रहिवासी श्रीधर यांच्या मदतीला धावले. तसेच त्यांनी श्रीधर यांची मारहाणीतून सोडवणूक केली, अशी तक्र्रार श्रीधर यांनी रत्नागिरी पोलीस शहरात दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अफान याच्याविरूद्ध भादवि कलम ३२४, ४२७, ४५३, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com