
पाटपन्हाळे येथे रिक्षा-कारची समोरासमोर धडक; सहाजण गंभीर जखमी
चिपळूण : कार आणि रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. गुहागर-चिपळूण मार्गावर पाटपन्हाळे साळवी स्टॉप परिसरात हा अपघात शनिवार दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. झाला. यात पाजपंढरीतील 2 लहान मुले व त्यांचे आई -वडील, अडुर बुधल (ता. गुहागर) येथील 1 महिला आणि गुहागरमधील 1 पुरुष असे 6 जण गंभीर जखमी आहेत. शृंगारतळीतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सर्वांना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे.
राजेश नरेश चुणेकर (रा. दापोली पाजपंढरी, वय 29) यांच्या मालकीच्या रिक्षातून (एम.एच.08 एक्यु 2997) प्रभा कमलेश चुणेकर (वय 40), उत्कर्ष कमलेश चुणेकर (वय 12), पंकज चोगले (वय 19) हे शृंगारतळीला आले. त्यांच्यासोबत मनोहर रघुनाथ चोगले (वय 46, पाजपंढरी) आणि कमलेश कृष्णा चुणेकर हे दुचाकीने शृंगारतळीला आले. हे सर्वजण अडूर बुधल येथे कार्यक्रमासाठी जात होते. शृंगारतळी येथील अंजली लक्ष्मण धोपावकर (रा. अडूर बुधल, वय 60) यांना घेऊन रिक्षातून अडूल बुधलकडे जात होते. यावेळी गुहागरकडून चिपळूणकडे निघालेल्या कार (एमएच 08 एक्स 0809) आणि रिक्षाची पाटपन्हाळे येथे समोरासमोर धडक झाली. ही कार सचिन ओक (वय 39, रा. गुहागर) चालवत होते. ते आपले वडील सतिश ओक (रा. गुहागर) यांना उपचारासाठी घेऊन निघाले होते. रिक्षा चालक राजेश चुणेकर यांच्या दोन्ही पायांना तर प्रभा कमलेश चुणेकर यांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच अंजली धोपावकर, उत्कर्ष चुणेकर आणि पंकज चोगले यांच्या हात पाय आणि तोंडाला दुखापत झाली. चार चाकीतील सतिश ओक यांना गाडीतून ओढून बाहेर काढण्यात आले. चालक सचिन ओक यांना किरकोळ दुखापत झाली आहे.