
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पसंती दापोली तालुक्याला
दापोली : दापोली तालुक्यातील दाभोळ ते केळशी या दरम्यान समुद्रमार्गे जवळपास 35 किमी अंतरातील दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, तामसतीर्थ, लाडघर, कर्दे, मुरूड, सालदुरे, पाळंदे, हर्णे, पाजपंढरी, आंजर्ले, पाडले, आडे आणि केळशी येथील किनार्यांवर पर्यटक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दापोलीत हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. येथील कोकणी खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी येथे कायम पर्यटक येतात. दरवर्षी पर्यटक नाताळच्या सुट्टीसाठी आणि नववर्षाच्या स्वागताकरिता खास दापोलीची निवड करत आहेत. यावर्षी देखील दापोली पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दापोलीतील दाभोळपासून केळशीपर्यंतच्या सर्वच समुद्र किनार्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. याआधी शनिवार, रविवार जोडून शासकीय आस्थापनांच्या सुट्टया आल्या की दापोलीतील समुद्र किनार्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. नाताळपासूनच येथील समुद्र किनारपट्टीवर पर्यटक दाखल झाले आहेत. अनेक रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षणे एक महिना आधीच झाली आहेत. त्यामुळे आयत्यावेळी येणार्या पर्यटकांना एकतर वनडे रिटर्न करावे लागत असून काही पर्यटक दापोली शहरात निवासी राहत आहेत. पर्यटन क्षेत्रात वॉटर स्पोर्टस्, उंट, पॅराशूट यामध्ये सध्या अनेक पर्यटक गुंतलेले दिसत आहेत. समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जा अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत.