रत्नागिरीचे पोलीस आता टोलेजंग इमारतीमधील फ्लॅटमध्ये राहणार, पोलिसांसाठी उभा राहणार १५ मजली टोलेजंग टॉवर
कायद्याचे रक्षण करताना लहान खोलीत राहणारे रत्नागिरीचे पोलीस आता टोलेजंग इमारतीमधील आलिशान फ्लॅटमध्ये राहणार आहेत. रत्नागिरी पोलिसांसाठी जिल्ह्यातील सर्वात उंच टॉवर असलेली १५ मजल्याच्या ३ इमारती उभ्या राहणार आहेत. त्यामध्ये तब्बल २२२ फ्लॅटसह पोलीस अधिक्षक कार्यालय उभारण्यात येणार आहे. कोकणातील पहिली सुसज्ज पोलीस कॉलनी रत्नागिरीत उभी राहणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
रत्नागिरी पोलीस कर्मचार्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. आता पर्यंत पोलीस मुख्यालयातील ब्रिटीशकालीन चाळीमध्ये पोलीस कर्मचारी ५ बाय १० च्या खोलीमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. मात्र त्याही चाळी प्रचंड नादुरूस्त असल्याने कर्मचार्यांना पावसाळ्यात पावसाच्या सरी अंगावर घेतच संसार करावा लागत होता.
सुमारे पाच वर्षापूर्वी पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने अभारण्यासाठी सर्व कर्मचार्यांना जुन्या खोल्या रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर कर्मचार्यांनी खोल्या रिकामी केल्या होत्या. मात्र नवी वसाहत उभारण्याला शासनाला मुहूर्त मिळत नव्हता. त्यानंतर गेली दोन वर्ष आलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे कर्मचारी वसाहतीचे काम रखडले होते. मात्र आता पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे गृह विभागाने कर्मचारी वसाहतीला मुहूर्त मिळाला आहे. शासनाने १५ मजली तीन इमारती उभारण्याला मान्यता दिली आहे. www.konkantoday.com