साटवली येथे घरावर धाड टाकून देशी, विदेशी मद्यासह 50 हजारांचा मुद्देमाल जप्त; दाम्पत्यावर गुन्हा दाखल
लांजा : साटवली भंडारवाडी येथे एका घरामधून हजारो रुपयांचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास लांजा पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूसह गोवा बनावटीचा 50 हजार 684 रुपयांचा दारूसाठा जप्त केला
आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीपत्नीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी नियमानुसार बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे विनापरवाना गावठी तसेच गोवा बनावटीच्या दारूची विक्री केली जात असल्याची खबर लांजा पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद कांबळे, तेजस मोरे, कॉन्स्टेबल नितीन पवार, प्रथमेश वारीक, चालक चेतन घडशी या पथकाने बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास साटवली भंडारवाडी येथे दिनेश कृष्णात आंबोळकर (47 वर्षे) आणि पत्नी सौ. दीप्ती दिनेश आंबोळकर (44 वर्षे) यांच्या घरावर धाड टाकली.
या धाडीत लांजा पोलिसांना घरामध्ये हजारो रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. गावठी हातभट्टी दारूसह देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या देखील याठिकाणी आढळून आल्या. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
या धाडीत पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्यात 5 हजार 550 रूपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु, तसेच गोवा बनावटीचे 44 हजार 904 रूपये किमतीचे मद्य जप्त केले. तसेच इतर साहित्य असा एकूण 50 हजार 684 रुपयांचा दारूसाठा पोलिसांनी यावेळी जप्त केला आहे. मद्यसाठ्यात 5 हजार 550 रूपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु व इतर असा 50 हजार 684 चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. या दाम्पत्याविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करत आहेत.