मंडणगड येथील मृत रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील पाले येथील 65 वर्षे रुग्णाचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त पसरल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. कोरोनाचा नवा व्हेरियंट थेट ग्रामीण भागात शिरला आणि त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. मात्र, बुधवारी दुपारी त्या रुग्णाचा आर.टी. पी. सी. आर. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे यंत्रणेची चिंता काहीअंशी मिटली म्हटली आहे. पाले गावातील मृत व्यक्तीला अनेक वर्षापासून दम्याचा आजार होता. ते नियमित चेकअपकरिता ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे गेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांना त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांनी त्यांची अँन्टीजेन चाचणी केली. हा तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता दापोली येथे हलविण्यात आले होते. तेथे या रुग्णाची आर. टी.पी. सी. आर. चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णाचे दापोली येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी पाली येथे अंतिम संस्कार करण्यात आले. अंतिम संस्कार करतेवेळी कोरोना बाधितांवर करण्यात येणार्या अंतिम संस्काराचे सर्व निकष पाळण्यात आले. यानंतर सक्रिय झालेल्या आरोग्य यंत्रणेने बुधवारी सकाळी त्यांच्या संपर्कात आलेल्या 26 जणांची कोरोना तपासणी केली आहे. बुधवारी दुपारी मृताच्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट आरोग्य यंत्रणेला मिळाला असून हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाबरोबरच यंत्रणेची चिंता काही प्रमाणात कमी झाली झाली.