रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात ३८६ शिक्षकांची नियुक्ती.

राज्यातील दोन जिल्हा परिषदांनी कंत्राटी शिक्षक भरती थांबवल्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील भरतीवर स्थगितीची टांगती तलवार होती; मात्र शासनाकडून प्रक्रिया स्थगितीचे कोणतेही आदेश न आल्यामुळे सोमवारी (ता. ६) ३८६ शिक्षकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यापूर्वी १०५ जणांना नियुक्ती दिली गेली होती.

१ ते १० पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांवर हे शिक्षक भरले गेले आहेत. त्यामुळे ११०० पैकी ४० टक्के पदांवर शिक्षक कार्यरत आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त राहिल्यामुळे ग्रामीण भागामधून तक्रारीचे सूर उमटत होते. राजकीय पक्षांनीही आंदोलनाचा इशारा देत सत्ताधाऱ्यांची अडचण केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये सुरू झाली. काही कालावधीतच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पुन्हा कंत्राटी शिक्षक भरती थांबली.

या गोंधळात नवीन शैक्षणिक वर्षात अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, असे चित्र पाहायला मिळत होते. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने काही शाळांवर कामगिरीने शिक्षक नियुक्त केले. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ लागला. याबाबत ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने रखडलेली कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरवात केली.

या नियुक्तीला राज्यभरातून विरोध होत असल्यामुळे पुन्हा त्यात अडथळा निर्माण झाला होता; मात्र शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेऊन जि. प. प्रशासनाने तातडीने थांबलेली प्रक्रिया वेगाने सुरू केली. पहिल्या टप्प्यात १०५ जणांना नियुक्ती दिली असून, दुसऱ्या टप्प्यात ३८६ जणांना पत्र दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button