
मंडणगडमध्ये महाराष्ट्र बँकेची शाखाच नाही अन् खाते खोलण्याचा तगादा; मुख्याध्यापकांना जावे लागतेय खेड, दापोलीत
मंडणगड : बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची मंडणगड तालुक्यात कोठेही शाखा नसताना सर्व शाळांना बँकेत खाते अनिवार्य असण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेच्या कामाकरिता येथील मुख्याध्यापकांना किमान चाळीस किलोमीटर इतक्या लांबीचा प्रवास करून खेड अथवा दापोली येथील बँकेच्या कार्यालयात जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांची खाती महाराष्ट्र बँकेत काढून त्या खात्याच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियानाच्या पैशासह अन्य व्यवहार वळवण्याचे नियोजन आहे. तालुक्यातील बँकेच्या शाखेची गैरसोय लक्षात घेता काही काळाकारिता हा विषय मागे पडला होता. प्रशासकीय यंत्रणेने महाराष्ट्र बँकेत खाते उघडण्यासाठी केलेल्या सक्तीला तालुक्यात सार्वत्रिक विरोधही झाला. मात्र नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीस शाळांना विश्वासात न घेता परस्पर बँकेकडे संपर्क करून कोणालाही न विचारता सर्व शाळांची खाती उघडून खातेपुस्तके आणली असल्याची माहिती पुढे आली आहे.
बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, आवेदनपत्र असा कोणताही सोपस्कर पूर्ण न करताच अथवा या संदर्भात शाळांना कोणत्याही सूचना न देता शाळेकडून कोणतीच कागदपत्रे घेतलेली नसताना नवीन खाते सुरू करून त्यांचा वापर करण्याची सक्ती सुरू झाली आहे. मंडणगड तालुक्यात महाराष्ट्र बँकेची शाखा नाही त्यामुळे व्यवहार करणे अवघड असून तालुक्यातील मुख्याध्यापक बँकेच्या कामासाठी वारंवार खेडला जात आहेत. यामुळे मुख्याध्यापकांचे काम वाढले आहे.