क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटणाऱ्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याचा ना. उदय सामंत यांचेकडून सन्मान
रत्नागिरी : महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटणाऱ्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने क्रिकेटच्या विश्वात सातत्याने चांगली कामगिरी सुरू आहे. त्याच्या या कर्तृत्वाची दखल राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. ‘सन्मान कर्तृत्वाचा’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात ना. उदय सामंत यांच्या हस्ते अविराज गावडे या रत्नागिरीच्या सुपुत्राचा सन्मान करण्यात आला.
ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात बाळासाहेबांची शिवसेनेकडून येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.
नुकत्याच पुणे येथील आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत अविराजने एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, लोणी या महाविद्यालयाविरुद्ध सामन्यात दोन ओव्हरमध्ये एकही रन न देता ९ विकेट घेत नव्या विक्रमाला गवसणी घातली होती. तसेच या आधीच्या आयआयटी हिंजवाडी महाविद्यालय विरुद्ध सामन्यातही अविराजने दोन ओव्हरमध्ये चार रन देत ७ विकेट घेतल्या. सातत्याने नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याची कामगिरी अविराज गावडे याने केली असून, या कामगिरीची दखल घेत त्याचा सन्मान करण्यात आला.