आंबा घाटात टँकर-मोटारसायकल अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ टँकर-मोटारसायकलचा भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लालासो खाशबा शेवाळे (वय- ५६ रा. ता. कराड. जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. ते आपल्या ताब्यातील (MH 50 Q 6184) मोटारसायकलने रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करीत होते. तर टँकर (MH10 CQ-5586) रत्नागिरी ते कोल्हापूरच्या दिशेने जात होता. याचवेळी आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ दोन्ही वाहने आली असता मोटारसायकल टँकरवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार लालासो शेवाळे हे जागीच ठार झाले. अपघातानंतर आंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०८ अँब्युलन्सने मृताला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, साखरपा पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.