खेडमधील कलाशिक्षक देवरुखकर यांच्या कलाकृतींची राज्यस्तरावर निवड
खेड : 62 व्या राज्य कला प्रदर्शनासाठी राज्यभरातून रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला, मुद्राचित्रण या चार विभागातून सुमारे पाचशे चित्रकारांनी या प्रदर्शनासाठी सहभाग नोंदविला होता. या प्रदर्शनामध्ये राज्यभरातून 215 चित्र व शिल्प यांची निवड केली जाते. त्यामधून 15 कलाकरांना पारितोषिक देऊन राज्यशासनामार्फंत गौरविण्यात येते. या प्रदर्शनामध्ये खेड येथील श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कुलमधील कलाशिक्षक राकेश रमेश देवरुखकर यांनी आत्तापर्यंत सातवेळा सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी त्यांना सन -2017 मध्ये राज्यशासनाचा कलाविभागाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी देखील त्यांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन दिव्यांग विभागात दुसर्यांदा राज्यशासनाच्या कलाकार विभागातून पुरस्कार प्राप्त केला आहे. गतवेळ प्रमाणे यावेळी देखील त्यांच्या निसर्ग चित्राला राज्यशासनाकडून गौरविण्यात येत आहे.
त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तीचित्रांची सुद्धा या प्रदर्शनामध्ये निवड झाली आहे.
राज्यशासनाच्यावतीने या निवड झालेल्या चित्रांचे ता.10 जानेवारी रोजी मुंबई येथील जहॉगीर आर्ट गॅलरी येथे सायंकाळी पाच वाजता प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याच दरम्यान मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या 15 कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन ता. 16 जानेवारी पर्यंत कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुले आहे. श्री. देवरुखकर यांना कलाविषयक अनेक पुरस्कार मिळाले आहे. या प्रदर्शनात माझ्या दोन चित्रांची निवड झाली. ही माझ्यादृष्टीने आनंदाची बाब असून माझ्या कलेची दखल राज्य स्तरावर घेतली गेली याचा मला अतिशय आनंद झाला आहे. भविष्यात वेगवेगळ्या विषयावर आधारीत चित्रे काढण्याचा माझा प्रयत्न राहील असे श्री.देवरुखकर यांनी सांगितले. देवरुखकर यांच्या आत्तापर्यंत 15 चित्रांची या गॅलरीत प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.