शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवणार्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सरपंच व सदस्याचे अभिनंदन केले. हा कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालय येथे शनिवारी पार पडला. तालुक्यामध्ये शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडी सरकारने 14 ग्रामपंचायती जिंकल्या. सर्व सरपंच व नवनिर्वाचित सदस्य यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांच्यासह
पदाधिकार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुक्यातील पूर्णगड, मावळंगे, तोणदे, टेंब्ये, टिके, कासारवेली, चांदोर, फणसवळे, भगवती नगर, मालुगंड, निरुळ व या आधी झालेल्या फणसोप व पोमेंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांना गौरवण्यात आले. ग्रामीण भागातील जनतेचे प्रेम अद्यापही बाळासाहेब व उध्दव ठाकरे यांच्यावर आहे. उध्दव ठाकरे यांनी नेहमीच सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निवडून आलेल्यांनी समाजकारण करून लोकांना न्याय द्यावा, असे आवाहन जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केले.