मांडवी येथे लागलेल्या आगीत जलवाहिनी, जिओ वाहिनी, भूमिगत वीजवाहिन्या जळाल्या
रत्नागिरी : मांडवी येथील जलवाहिनी, जिओ आणि भूमिगत वीजवाहिनी जळून गेली. तोरण पर्याला लागून असलेल्या या वाहिन्या आगीत जळाल्या. शनिवारी पहाटे 5.45 वाजण्याच्या सुमारास ही आग रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने आटोक्यात आणली. थंडीत शेकण्यासाठी पेटवलेल्या आगीमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज आहे. महावितरणच्या अभियंत्यांनी शॉटसर्किट वगैरे काहीच झाले नसल्याचे सांगितले. महावितरणच्या हार्बर शाखेने तातडीने वीजपुरवठा खंडित केला. शहरातील घुडेवठारकडून मांडवीकडे जाणार्या तोरण पर्याला लागून जिओची केबल, भूमिगत वीजवाहिनी आणि जलवाहिनी गेली आहे. या वाहिन्यांनी अचानक पेट घेतला. माजी नगरसेवक सुशांत उर्फ मुन्ना चवंडे यांनी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला आणि महावितरणला या घटनेची माहिती दिली. लगेचच अग्निशामक घटनास्थळी दाखल झाला. पाठोपाठ महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विजेसंदर्भात कोणतेही स्पार्किंग वगैरे झालेले नाही, असे महावितरणचे शाखा अभियंता वैभव मोडक यांनी सांगितले.