हातिवले टोल नाक्यावर नीलेश राणेंनी अधिकाऱ्यांना खडसावले; मनसेच्या 25 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलसेवा सुरू करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीयांनी उधळवून लावला. टोलविरोधातील वाढता असंतोष पाहून संबंधित अधिकारी नरमले आणि टोलवसुलीला स्थगिती देणे भाग पडले. आता पुढील काही दिवसांत एक बैठक आयोजित केली जाणार असून त्या बैठकीत टोलबाबतचा निर्णय होणार आहे. टोलविरोधी भूमिका घेणार्या मनसेच्या काही पदाधिकार्यांसह सुमारे 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.
मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम अद्याप मार्गी लागलेले नाही. तरीही हातिवले येथील टोलसेवा सुरू करण्यात आली. त्याला जोरदार विरोध झाला. टोलविरोधात तालुक्यातील सर्वपक्षीय एकवटले. दरम्यान भाजप नेते व माजी खासदार नीलेश राणे हे गुरुवारी सकाळी हातिवले टोलनाक्यावर दाखल झाले.
राणे टोलनाक्यावर आल्यावर प्रथम त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व्ही. एल. पाटील, महामार्ग प्रकल्प संचालक वसंत पंगेरकर, अन्य अधिकारी यांना फैलावर घेतले. आमचा टोलला अजिबात विरोध नाही. टोल तुम्ही घ्या, पण आधी संपूर्ण महामार्गाचे काम मार्गी लावा. देण्यात येणार्या सुविधांची पूर्तता करा. ज्या जमीन मालकांचा अद्याप मोबदला देण्यात आलेला नाही, तो द्या आणि मगच टोल वसूल करा. महामार्गावर अपुरी सुविधा असताना टोल वसूल करू नका. तत्काळ वसुली थांबवा. जोवर टोलला स्थगिती मिळत नाही, तोवर आम्ही कुणीही येथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव ते हातिवले या भागातील महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी हातिवलेपासून मुंबईकडे अद्यापही काम अपूर्ण आहे, त्यामुळे येथे टोल वसुली थांबवावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून स्थानिक परिस्थितीची माहिती दिली व त्वरित टोलवसुली थांबवण्याची मागणी केली . यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जमीर खलिफे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर व सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजापूरच्या प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव या देखील टोलनाक्यावर दाखल झाल्या.
राज्यातील टोल विरोधात सातत्याने भूमिका घेणार्या मनसेने हातिवले येथील टोलविरोधात सुध्दा आक्रमक भूमिका घेतली. सुरू झालेली टोल वसुली तत्काळ थांबवावी, यासाठी पावित्रा घेतला. कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन अखेर पोलिसांनी मनसेच्या सुमारे 25 जणांना ताब्यात घेतले व त्यांना नंतर सोडून दिले. त्यामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, जिल्हा सहसंघटक मनिष पाथरे, राजापूर तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, मनोज देवरूखकर, दिलीप लांजेकर, रत्नागिरीचे सुनील साळवी, पुरुषोत्तम खांबल, राजा गुरव, संजय जड्यार, प्रदीप कणेरे सतीश खामकर, मंगेश नारकर, संकल्प तांबे, अमोल सोगम, मुकेश सोगम यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा यात समावेश होता.