रत्नागिरी जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचार्यांचे रक्तदान
रत्नागिरी : जिल्हा परिषद व आरोग्य विभाग तसेच कोल्हापूर येथील अॅस्टर आधार हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कर्मचारी तसेच त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्व. शामरावजी पेजे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरही पार पडले. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही रक्तदान केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच जागतिक आरोग्य संरक्षण दिनानिमित्त हे शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. त्यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रकल्प संचालिका श्रीम. नंदिनी घाणेकर तसेच अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिरासाठी अॅस्टर आधार हॉस्पिटलचे समन्वयक डॉ. विजय सुवासे यांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथक आपापल्या उपकरणासह उपस्थित होते. त्यामध्ये कार्डीऑलोजिस्ट, चेस्ट फिजिशियन, नेत्र चिकित्सक तसेच इ. सी. जी. टेक्नीशीयन यांचा समावेश होता. आरोग्य विभागाकडून डॉ. बिष्णोई, डॉ. अक्षय वालिया, डॉ. संपत मिना, डॉ. अंकुर भोळे तसेच डॉ. श्रुती कदम हे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. स्वाती शेंडे यांनी फिजिओ थेअरिपीस्ट म्हणून शिबिरामध्ये सेवा दिली. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. उत्तम कांबळे, डॉ. शैलेश गावंडे व डॉ. अंजली पाटील, डॉ. श्रीम. हरदास उपस्थित होते. ब्लड बँकेच्या मॅथ्यू सिस्टर या आपल्या सर्व पथकासह उपस्थित होत्या. रक्तदान शिबिराची सुरुवात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत यांनी आपल्या रक्तदानाने केली. रक्तदान करणार्यांना एच.डि.एफ.सी बँकेमार्फत मुळये यांनी अल्पोपहार दिला. शिबिराचा एकूण 250 कर्मचारी व नातेवाईक यांनी विविध तपासण्या करून लाभ घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, कृषी अधिकारी अजय शेंडे यांच्या समवेत 50 कर्मचार्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी सामान्य प्रशासन विभाग तसेच आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी सहकार्य केले.