चाफवली, मेघी, देवळे परिसरात ‘लम्पी’ आजाराने दगावताहेत जनावरे
संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून गावातील गोरगरीब शेतकर्यांची जनावरे लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावली आहेत. तर यंत्रणेकडून योग्यवेळी उपचार न झाल्यामुळे अनेक जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे.
चाफवली गावातील तळीवरचीवाडी येथील बाळाराम सावजी केसव यांचा २५ हजार रुपये किमतीचा बैल लम्पी आजाराने मृत्यूमुखी पडला आहे. भटाचा कोंड वाडीतील सुन्या भोजे याचा पाडसा पाडा, बावा कोलापटे याचे वासरू, पर्शराम चाळके यांची ३५ हजाराची दुभती गाय अशी जनावरे दगावली आहेत. तसेच इतरही काही जनावरे दगावल्याचे समजते.
चाफवली गावातील मराठवाडी, उगवता कोंडवाडी, भोयरेवाडी, बौद्धवाडी, करवंजेवाडी, रावणवाडी या वाड्यातील जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. तर रामचंद्र जांगळी यांची ४० हजार किमतीची सायवाल जातीची गाय गेले वीस बावीस दिवस जमिनीवर आडवी पडून आहे. चाफवली, देवळे, मेघी या गावात लम्पी आजाराचा फैलाव झाला असून या आजाराची अनेक जनावरांना लागण झाली आहे. त्यामुळे जनावरांना उपचार करून शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. याबाबत संबंधित यंत्रणेने त्वरित उपाययोजना करावी, तसेच शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्यांमधून करण्यात येत आहे.