कर्दे येथे नारळ काढताना पडल्याने तरुणाचा मृत्यू
दापोली : तालुक्यामधील कर्दे येथे नारळ काढताना तोल जाऊन पडल्याने विकी चव्हाण या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 22 डिसेंबर रोजी घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकी चव्हाण (राहणार नारायण पेठ, होतकुंडला तांडा, तालुका मधुर, जिल्हा नारायण पेठ, राज्य आंध्र प्रदेश) हा त्याचा मामा उमेश राठोड (सध्या राहणार-खेड बाईतवाडी) याच्याकडे राहत होता. 22 डिसेंबर रोजी सकाळी कर्दे येथील आदिल खतीब यांच्या बंगल्याच्या टेरेसवर उभा राहून शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावरील नारळ काढत होता. तोल जाऊन तो खाली पडला. त्याला उपचाराकरिता तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मयत झाल्याचे घोषित केले. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार गोरे करीत आहेत.