हातिवले येथील टोलवसुली पाडली बंद, सर्वपक्षीय एकवटले; नीलेश राणेंच्या भूमिकेकडे लक्ष
राजापूर : मुंबई गोवां महामार्गाचे काम अपूर्ण असतानाच दुसरीकडे बुधवारी हातिवले येथे टोल वसुली सुरु करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या वाहनचालकांसह सर्वपक्षियांनी टोलनाक्यावर हंगामा केला. महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोवर टोल वसुली सुरु होता कामा नये, अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला.
गेल्या काही दिवसांपासून टोलवसुली सुरू झाली नव्हती. मात्र, ठेकेदाराकडून बुधवारपासून टोलवसुली सुरू करण्यात आली. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्यांसह वाहनचालकांनी पुन्हा एकदा टोलवसुली विरोधात आक्रमक पवित्रा घेत विरोध केला. यावेळी वाहने थांबवून भर रस्त्यामध्ये काहींनी ठिय्या मांडत टोल वसुलीविरोधात आंदोलन छेडले.
टोल वसुलीला सुरूवात झाल्याची माहिती मिळताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष अशफाक हाजू, शहराध्यक्ष सौरभ खडपे, भाजपच्या युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सरवणकर, प्रसाद मोहरकर, पंढरीनाथ आंबेरकर आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, वाहनचालकांनी टोलवसुलीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत त्याला विरोध केला. उपस्थितांनी ठेकेदाराशी संवाद साधत टोलवसुली करू नये, अशी सूचना केली. त्यानंतर, चर्चा सुरू असताना माजी खासदार नीलेश राणे यांनी ठेकेदाराशी मोबाईलद्वारे संवाद साधल्यानंतर गुरुवारपर्यंत टोलवसुली तात्पुरती थांबविण्याचा निर्णय घेतला.
या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यावरुन देखील बंदोबस्त मागविण्यात आला होता. अखेर गुरुवारपर्यंत टोलवसुली स्थगित ठेवण्यात आली आहे. भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे गुरुवारी राजापुरात येत असून त्यावेळी टोलबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.