रत्नागिरीत कार, दुचाकी लांबवणाऱ्या दोघा संशयितांना अटक
रत्नागिरी : वायफायची केबल ऑपरेटर म्हणून कामासाठी जाऊ तेथील वाहनाची किल्ली चोरली. घरी कोणीही नाही याचा अंदाज घेत कालांतराने त्या किल्लीद्वारे वाहन लांबवायचे आणि यातून मौजमजा करण्याचा छंद त्यांना लागला खरा… पण पोलिसांच्या खाक्याने सत्य उघड झाले. या दोन वाहन चोरणाऱ्या तरुणांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 7 लाख 80 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रथम जयेश खानविलकर (वय 19, रा. लक्ष्मी कृपा शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी) आणि आयुष संतोष भागवत (वय 19, रा. टीआरपी, सह्याद्रीनगर नाचणे, रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत. सध्या यांची रवानगी न्यायालयाने पोलिस कोठडीत केली आहे.
यातील संशयित खानविलकर हा गाडीच्या किल्ल्या चोरून पार्किंगमधल्या गाड्या चोरत असे. यामुळे रत्नागिरीत पूर्वी ज्या गाड्या चोरीला गेलेल्या आहेत, त्यात या संशयितांचा हात आहे का? याचा तपासही पोलिस करत आहेत.
दि. 8 ते 14 डिसेंबर रात्री 11 वा. सुमारास साईनगर-कुवारबाव येथे कार चोरीची घटना घडली होती. श्रीकांत धाकटू शिंदे (वय 68, रा. साईस्नेह आयटीआय सोसायटी, साईनगर-कुवारबाव, रत्नागिरी) यांच्या घरी संशयित प्रथम खानविलकर वाय-फायचा ऑपरेटर म्हणून काम करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने शिंदे यांच्या घरातील चावी चोरुन नेली होती. त्यानंतर घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेत त्यांची कार ( एमएच-08 एएन- 6808) चोरुन नेली. या प्रकरणी शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तपासात शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व त्यांची टीम हवालदार गोसावी, प्रवीण बर्गे, पोलीस नाईक संकेत महाडिक, मनवल, पडळकर, हवालदार अमोल भोसले, मनोज लिंगायत, भालेकर यांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर चौकशी केली असता गुन्ह्यातील गाडी चोरल्याचे कबूल केले. भाड्याने राहात असलेल्या ठिकाणी गाडी पार्क केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोन पंचांना समक्ष घेऊन आदीनाथ नगर येथे पार्क केलेली मोटार खानविलकर याने दाखविली. यावेळी पोलिसांनी पंचनामा करून घराची झडती घेतली असता खानविलकरच्या घरात वाहनांच्या वेगवेगळ्या नंबर प्लेट दिसून आल्या. तसेच अन्य साहित्य व महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र व महाराष्ट्र शासनाची पट्टी असे साहित्य दिसून आले. दुचाकी चोरी केल्यानंतर संशयित आयुष भागवतच्या सहकार्याने नंबर प्लेट बदलून विल्हेवाट लावत असल्याचे पंचांसमक्ष सांगितले. तसेच चोरीच्या सगळ्या गाड्यांवर श्री कालभैरव नावाचा सिंबॉल वापरत असल्याचे सांगितले.