चिपळूण-गाणे गावात मतदान झालेच नाही, ग्रा.पं.चा कारभार चालवणार प्रशासकामार्फत

चिपळूण : तालुक्यातील गाणे ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, आयत्यावेळी काही ग्रामस्थांनी प्रभाग रचनेवर आक्षेप घेतल्याने उमेदवारी अर्ज भरले गेले नाहीत. विशेष म्हणजे सरपंच पदासह एकाही ग्रा.पं. सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज न भरल्याने या गावामध्ये निवडणूक लागून देखील निवडणूक झालीच नाही. त्यामुळे आता येथे ग्रा.पं.चा कारभार प्रशासकामार्फत चालविण्यात येणार आहे.
गाणेमध्ये 7 जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी उमेदवारी अर्ज भरावेत म्हणून प्रयत्न केले मात्र, ते निष्फळ ठरले. गाणे गावातून निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. गाणेमध्ये गेली 35 वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपली आहे.
गेली पाच वर्षे निवृत्ती केशव गजमल या तरूण सरपंचाने यशस्वी कामगिरी केली. माजी सरपंच गजमल हे यावेळच्या निवडणुकीस देखील इच्छुक होते. गाव बैठकीत उमेदवारीबाबत बैठक होत असताना निवृत्ती गजमल यांनी निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवार असल्याचे सांगितले होते. त्यांनी गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत गावात सहा ते सात कोटींची विकास कामे केली. सर्वाना सोबत घेऊन त्यांनी विकास कामांवर भर दिला. मात्र बैठकीदरम्यान त्यांनाच काही ग्रामस्थांनी उमेदवारीसाठी विरोध केला. मात्र बहुतांशी लोकांनी पाठींबा दिल्याची माहिती उपलब्ध होत आहे.
एका जागेसाठी निवडणूक होऊ दे अशीही चर्चा झाली. मात्र तीही फोल ठरली. सरतेशवटी कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. शेवटी एक वाडी दुसर्‍या प्रभागात जोडली गेल्याचा मुद्दा उपस्थित झाला. प्रभागरचेनेवेळी कोणीच त्यावर आक्षेप न घेतल्याने आता काहीच करता येत नसल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी गाणे ग्रामस्थांची भेट घेत चर्चा केली. तरीही एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीवर गाणे ग्रामस्थांचा बहिष्कार असल्याचे दिसून येत आहे. परिणामी पुढील काही महिने या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट लागू राहणार आहे.
या संदर्भात येथील प्रभारी तहसीलदार तानाजी शेजाळ यांना विचारले असता प्रभाग रचनेनंतर गाणेमधून एकानेही हरकत नोंदवली नव्हती. परिणामी, प्रभाग रचनेत कोणताही बदल झाला नाही. आयत्यावेळी आक्षेप घेऊन उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. मात्र, आता प्रशासनाच्यावतीने ग्रा.पं.चा कारभार चालविला जाईल आणि पुढच्या काही महिन्यात गाणेसाठी निवडणूक लागेल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button