
पाऊस सुरु होताच रघुवीर घाटातील निसर्गसौन्दर्याला बहर, भूतलावरील स्वर्गसुख अनुभवण्यासाठी रघुवीर घाटात पर्यटकांची गर्दी
खेड : विविधतेने नटलेली कोकण भूमी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते. येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे, किनाऱ्यालगत असलेल्या नारळी-फोफळीच्या बागा, या बागांमधून शील वाजतात फिरणाऱ्या वारा, येथील बोलीभाषा, आदरतिथ्य, यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पावसाळ्यात तर कोकणाचे सौन्दर्य आणखीनच खुलून येते आणि पर्यटकांची पावले आपोआपच कोकणाकडे वळू लागतात. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा खेड तालुक्यातील रघुवीर घाट. पावसाळ्यात या घाटातील निसर्गसौन्दर्य न्याहाळताना स्वर्गसुखाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. एका बाजूला उंचच्या उंच कातळी कडे, त्यावरून कोसळणारे दुधाळ पाण्याचे धबधबे, त्याचे अंगार उडणारे तुषार, तर दुसऱ्या बाजूला हिरला शालू पांघरलेली खोल दरी, या दरीतून हळुवारपणे वर येणारी धुक्याची चंदेरी चादर हा निसर्गाचा नजारा पाहण्यासाठी पाऊस सुरु झाला कि रघुवीर घाटात पर्यटकांची मोठी गर्दी होते, कोकणात यावर्षी मान्सूनचे आगामी काहीसे उशीरानेच झाले मात्र आगमन झाल्यापासून संततधार पाऊस कोसळत असल्याने रघुवीर घाटात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
खेड तालुक्यातील रघुवीर घाट खेड शहरपासून साधारणता २१ किलोमीटर अंतरावर आहे. या घाटात जायचे झाल्यास खेडहून खोपी पर्यंत एसटी बस आणि तिथून पुढे खासगी वाहनाने जावे लागते. सुमारे सात ते आठ किलोमीटरचा हा घाट रस्ता असून घाट चढायला सुरवात केली कि घाटातील निसर्ग सौन्दर्य खुणावायला लागते. नागमोडी वळणे घेत जस जसे आपण घाट चढू लागतो तसतशी निसर्गाची किमया आपल्या नजरेच्या टप्यात येऊ लागते साधारणतः ६ किलोमीटरचे अंतर चढून वर गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या उंच कातळी कड्यावरून दुधाळ पाण्याचे झरे जमिनीकडे झेपावत असतात. हे दृश्य पाहताना डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटून जाते. उंचावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याचे तुषार जेव्हा अंगावर उडतात तेव्हा स्वर्गसुख अनुभवल्याचा भास होतो. उंचावरून खाली कोसळणाऱ्या धबधाब्यामध्ये मनसोक्त भिजल्यावर उजव्या बाजूच्या खोल दरीमध्ये डोकावायचे. दरीतून वर येणारी चंदेरी धुक्याची चादर पाहताना आपल्याला जगाचाही विसर पडल्याशिवाय रहात नाही.
भूतलावरील स्वर्ग असलेल्या रघुवीर घाटात पावसाळी पर्यटन करताना खायला गरम गरम भजी खायची इच्छा झाली तर या घाटात शिवसहयाद्री हॉटेल आहे. बाहेर कोसळणारा पाऊस, धुक्याने भारलेला रघुवीर घाट अनुभवत पुढ्यात आलेली शिवसह्याद्री हॉटेलची भजी खाताना एक वेगळाच अनुभव मिळतो.
पावसाळ्यात पर्यटकांसाठी स्वर्गसुख देणारा हा रघुवीर घाट यावर्षी धोका दायक स्थितीत आहे. गतवर्षी २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत हा घाट दरीच्या बाजूने ठिकठिकाणी खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करणे गरजेचे होते मात्र दुर्देवाने घाट रस्ता दुरुस्तीचे काम न झाल्याने यावर्षी खचलेला रस्ता पर्यटकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात घाटात पर्यटकांची होणारी गर्दी आणि खचलेला घाट यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासन रघुवीर घाट पर्यटकांसाठी बंद करण्याची शक्यता आहे. जर प्रशासनाने घाट बंद करण्याचा निर्णय घेतला तर यावर्षी कोकणात येणारे पर्यटक रघुवीर घाटातील निसर्गसौदर्य अनुभव घेण्यापासून वंचित राहणार आहेत. खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांना याबाबत विचारले असता त्या म्हणालया , पावसाळ्यात हा घाट पर्यटकांसाठी बंद करायची की नाही हा निर्णय प्रातांधिकारी यांचा आहे. आम्ही त्यांच्याशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून सूचना आल्यावर पोलीस प्रशासन कार्यवाही करेल. असे त्यांनी सांगितले. जो पर्यंत प्रशासण घाट बंद करण्याचा निर्णय घेत नाही तो पर्यंत पर्यटकांना घागटामध्ये पर्यटनास मुभा असणार आहे मात्र ठिकठिकाणी रस्ता खचला असल्याने पर्यटकांनी खबदारी घेऊन घाटात पर्यटनाचा आनंद लुटणे आवश्यक आहे.
www.konkantoday.com