
लांजातील नगरसेवक, नगराध्यक्षांमध्ये हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे : आमदार राजन साळवी यांचे आव्हान
लांजा : शिवसैनिकांच्या मेहनतीवर आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिंदे गटात प्रवेश केलेल्या लांजा नगर पंचायतीमधील नगराध्यक्ष व सात नगरसेवकांना आमदार राजन साळवी यांनी दिले. लांजा येथील शिवसेना (ठाकरे गट) पक्ष कार्यालय येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौर्याचा नंतर लांजा तालुका शिवसेनेला (ठाकरे गट) मोठे भगदाड पडले आहे. लांजा नगर पंचायतीमध्ये एकहाती सत्ता असलेल्या शिवसेनेच्या तब्बल सात नगरसेवकांनी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्यासह शिवसेनेत (शिंदे गट) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. लांजा न.पं.मधील शिवसेनेच्या लांजा-कुवे शहर आघाडीमधील सात नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला. यामुळे लांजा तालुका शिवसेनेतील दुफळी पुढे आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्याच्यावेळी झालेल्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर लांजा येथे आ.राजन साळवी यांच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आ. राजन साळवी बोलताना म्हणाले की, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत हे जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष असून धनुष्यबाणाच्या चिन्हावर ते निवडून आलेले आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी अनेकजण इच्छुक असतानाही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नगराध्यक्ष बाईत यांना पक्षाने संधी दिली. सामान्य शिवसैनिकांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आणले. नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्यात जर का हिम्मत असेल तर त्याने तत्काळ नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. नगराध्यक्षांसह गेलेल्या इतर नगरसेवकांनी देखील तत्काळ आपल्या पदाचे राजीनामे देऊन धनुष्यबाणाविना निवडून येऊन दाखवावे. तसेच येणार्या पुढच्या निवडणुकीवेळी या गद्दारांना जनता आणि शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
या पत्रकार परिषदेवेळी आ. राजन साळवी यांनी शिंदे गटात गेलेल्यांपैकी शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी असलेले शिवसेना उपशहर प्रमुख सचिन डोंगरकर, शहर सचिव प्रसाद भाईशेट्ये, युवती शहर संघटिका सौ. दुर्वाभाई शेट्ये यांची पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
यावेळी आ. राजन साळवी यांनी सांगितले की, माझ्यावर मागील काही दिवसांपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अँटी करप्शन ब्युरो कडून माझी चौकशी लावण्यात आली. तसेच यापुढे ईडीची कारवाई देखील माझ्यावर होऊ शकते, तरीसुद्धा मी त्या कोणत्याही कारवाईला घाबरत नसून माझी निष्ठाही फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी आहे. त्यामुळे मी ठाकरेंची शिवसेना सोडणार नाही, असेही आ. साळवी म्हणाले.