मतदान करून नवरदेव चढले बोहल्यावर; पाचल, चिखलीमध्ये झालेल्या लग्नांची चर्चा
राजापूर : नवरदेवाने मतदान केंद्रावर वराच्या पेहरावात उपस्थिती लावून मतदान केल्याचे पाचल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. यातील वराचे नाव अक्षय महादेव तळेकर आहे. पाचल दिवाळवाडी येथील मतदान केंद्रावर त्यांनी सकाळी साडेआठच्या दरम्यान मतदान केले. अक्षय याचा दुपारी साडेबारा वाजता पाचलमधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात विवाह होणार होता. त्यामुळे मतदान करता यावे म्हणून नवरदेव आपल्या मोजक्याच सहकार्यांसह मतदान केंद्रावर आले होते. राजापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाला रविवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी सुरुवात झाली.
रविवारी ग्रामपंचायत मतदानाच्या दिवशी गुहागर – चिखलीमधीलही एका तरुणाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मुंडावळ्या बांधून थेट मतदानाचा अधिकार बजावला. पहिले मतदान मग लग्न, असा निश्चय करीत लग्न मंडपातून थेट मुंडावळ्या बांधून मतदानाला हजर झाला. अभिषेक गोयथळे असे त्याचे नाव आहे. लोकशाहीने दिलेला जो मताधिकार आहे, तो अधिकार बजावण्यासाठी अभिषेक याने प्रथम लग्नाच्या आधी मतदानाला महत्त्व दिले.