
जिल्ह्यातील 792 अंगणवाडी इमारतींवर बसवणार सौरपॅनल; 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून जिल्ह्यातील 792 अंगणवाडी इमारतींवर सौरपॅनल उभारली जाणार असून त्यासाठी 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर जि. प. चे वर्षाकाठी 36 लाख रुपये वाचणार आहेत.
जिल्ह्यात अनेकवेळा वेळेत वीजबिले न भरल्यामुळे जिल्हा परिषद इमारतींचा वीज पुरवठा खंडित केला जातो. त्याचा परिणाम नियमित व्यवहारांवर होत असल्यामुळे शासनाने ‘सोलर मिशन’ कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी इमारतींसह प्राथमिक शाळांनाही सौर पॅनेलद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या इमारतींना सौर पॅनेलद्वारे वीज पुरवठा करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे.
पुढील टप्प्यात ग्रामपंचायत कार्यालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी गोळप येथे एक मेगावॅटचा प्रकल्प 2022-23 या आर्थिक वर्षात उभारण्यात येणार आहे. तिसर्या टप्प्यात अंगणवाडी इमारतींवर सौर पॅनेल बसविण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद कृषी विभागाकडून पाठविण्यात आला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजनमधून 15 कोटी रुपयांची मागणी केली आहे. अंगणवाडींना सरासरी महिन्याला 400 रुपये विजबिले येते. जिल्ह्यातील 792 अंगणवाडी इमारतींना विज पुरवठ्यासाठी सौर उर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. यामुळे वर्षाचे सुमारे 36 लाख रुपयांच्या विजबिलाची बचत होणार असून विजेचा पुरवठा बिल न भरल्यामुळे खंडित करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. एका अंगणवाडीसाठी दिड वॅट विजेची निर्मिती होईल अशी पॅनेल बसविण्यात येणार आहेत. तयार झालेली विज महावितरणच्या ग्रीडला पुरवली जातील. त्या वीजेच्या बदल्यात बिलाची रक्कम वजा करुन घेतली जाईल.