भगव्या गुढ्यांसह ढोलताशांचे गजरात रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांचे केले जंगी स्वागत
रत्नागिरी : मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरी दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून रस्त्यावर गुढ्या उभारून, ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विमानतळ ते आठवडा बाजार मार्गावर भगवे झेंडे लावून सजावट करण्यात आली होती. चौका – चौकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत ढोलपथकांनी केले. सुहासिनींनी ना. शिंदे यांचे औक्षण करून स्वागत केले. रत्नागिरी विमानतळावर आगमन झाल्यानंतर ना. शिंदे हे मारुती मंदिर येथे आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ना. शिंदे आणि श्रीदेव भैरी बुवा चरणी नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, बंदरे व खनीकर्म मंत्री दादा भुसे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार योगेश कदम माजी आमदार सदानंद चव्हाण उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाबाहेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी कर्मचार्यांसह ना. शिंदे यांचे औक्षण करून स्वागत केले.