
राजीवड्यातील बनावट काझी प्रकरणी कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार
रत्नागिरी : बनावट दस्तावेज बनवून शासनमान्य काझी म्हणून निकाह (विवाह) लावून देण्याच्या तक्रारीची कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दखल घेतली आहे. खलील वस्ता यांनी हे प्रकरण गेल्या सात वर्षांपासून लावून धरले आहे. यामध्ये पोलिस निरीक्षकांसह बीट अंमलदार आणि तपासिक अधिकार्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
राजीवड्यातील एक जण बनावट शासकीय दस्तावेज बनवून निकाह लावत असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात केली होती. निकाह लावणार्या या व्यक्तीकडे शासनाची काझी म्हणून कोणतीही मान्यता नाही, असे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. भारतीय कायद्यातील काझी अॅक्ट 1880 प्रमाणे रत्नागिरी क्षेत्रासाठी काझी नियुक्त नसताना संशयिताने काझी म्हणून स्वत:चा खोटा निकाहनामा आणि एका मस्जिद व मदरसाच्या ट्रस्टचा शिक्का तयार केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. हीच व्यक्ती काझी म्हणून काम करत असताना महावितरणमध्ये नोकरी करत होती. कायद्याचा ससेमिरा मागे लागल्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा दिल्याचे तक्रारदार खलील वस्ता यांनी सांगितले.
संशयितांनी याप्रकरणी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घेतला आहे. परंतु पोलिसांकडून योग्य कार्यवाही होत नसल्याने न्यायालयात धाव घेतली. शेवटी खलील वस्ता यांची फिर्याद खोटी असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे सांगून हा तपासच बंद करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार खलील वस्ता यांनी केला आहे. त्यानुसार महानिरीक्षक कार्यालयाकडून योग्य चौकशी करून तक्रारदार खलील वस्ता यांना कळवण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.