
बेंगळुरू येथे झालेल्या गो कार्ट डिझाईन चॅलेंज स्पर्धेत राजेंद्र माने महाविद्यालयाला उपविजेतेपद
संगमेश्वर : तालुक्यातील आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम फुल थ्रोटलने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धा गाजवली आहे. नुकत्याच बेंगळुरू येथे झालेल्या गो कार्ट डिझाईन चॅलेंज स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. इसनी मोटार स्पोर्ट फॉर्म्युला गो कार्ट डिझाईन चॅलेंज सिझन नऊमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या विविध शाखेतील 25 सदस्यीय टीमने एकूण तीन किताब पटकावून पुन्हा एकदा महाविद्यालायाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
विविध शैक्षणिक संस्थामधील तब्बल 65 हून अधिक टीम या स्पर्धेत उतरल्या होत्या. गो कार्ट डिझाईन चॅलेंज स्पर्धेत दरवर्षी शेकडो दिग्गज शैक्षणिक संस्थाच्या विद्यार्थी टीम सहभागी होतात. ही स्पर्धा जनरल मोटर्स, टाटा मोटर्स, होंडा, फोर्ड यासारख्या ऑटोमोबाइल डिझाईन व उत्पादन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाते. ऑगस्टमध्ये बेंगळूरु ही स्पर्धा घेण्यात आली. देशभरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी स्पर्धा परीक्षण केले. टीमचा कप्तान महिप सावंत तसेच रामचंद्र रेगे, अश्विन टिके, अमोल सावंत व इतर विद्यार्थी सदस्यांचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले. टीम अॅडवायझर प्रा. सुमित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या गो कार्टची निर्मिती केली आहे.
संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, कार्यकारी अध्यक्ष नेहा माने, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी टीममधील सर्व सदस्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. टीमच्या या उत्तुंग यशामुळे विवध स्तरातील मान्यवरांकडून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.