शिंदे – फडणवीस सरकारकडून शेतकर्यांच्या हिताचे निर्णय; कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन वाखाणण्याजोगे : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे दापोलीत प्रतिपादन
दापोली : शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कोकणातील काजू आणि आंबा पिकासाठी 200 कोटींचे पॅकेज या सरकारने घोषित केले असून शेतकर्यांना देखील याचा फायदा होणार आहे. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जे नवनवीन संशोधन करण्यात आले आहे, याचे मूल्यमापन सरकार करेल. विद्यापीठाकडून संशोधनाचे झालेले काम वाखण्याजोगे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दापोली येथे केले.
ते दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्यावतीने संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीच्या कार्यक्रमाला आले होते. दि. 14 रोजी ना. सत्तार यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी करून विकसित केलेल्या वाणांची माहिती घेतल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, दापोलीतील विद्यापीठाचे कुलगुरू संजय सावंत, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, परभणीचे डॉ. इंद्रमणी तसेच अकोला विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, महासंचालक रावसाहेब भागडे यांच्यासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ उपस्थित होते.