
सावधान! निवळी-हातखंबा दरम्यान अपघातांमध्ये वाढ; रत्याच्या कामावर मारलेल्या पाण्यात घसरताहेत वाहने
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सध्या हातखंबा ते निवळी दरम्यान सुरू होऊन महिना झाला तरीही काम पूर्ण होताना दिसून येत नाही. मुख्य रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने सध्या नागरिक, वाहनचालक व दुकानदार यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यातच सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर मारत असलेले पाणी देखील अपघातास कारणीभूत ठरत आहे.
हातखंबा ते निवळी दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन बरेच दिवस लोटले. या रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणार्या धुळीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. धुळीचे लोळ हवेत पसरतात त्यामुळे ठेकेदार सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी मारत आहे. या पाण्यातून दुचाकीस्वार घसरून अपघाताच्या घटना घडत आहे. या मार्गावर दररोज एक ते दोन अपघात हमखास होत असल्यामुळे दुचाकीस्वारांना हा मार्गच धोकादायक ठरत आहे.
ग्रामीण भागातील नागरिक दररोज कामानिमित्त रत्नागिरी शहरात येत असतात. पुन्हा सायंकाळी याच मार्गावरून नागरीकांना घरी परतावे लागते. या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने त्याचा त्रास पादचारी, वाहनचालक व लगतच्या दुकानदारांना देखील होतो. या सर्वच त्रासामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रवासी, वाहनचालक हैराण झाले आहेत.