वनविभागाच्या कार्याचे प्रधान वन रक्षकांनी केले कौतुक

रत्नागिरी : जिल्हा दौर्‍यावर असणार्‍या प्रधान वन रक्षक डॉ. राव यांनी जिल्ह्यातील कातळशिल्पांची माहिती मानद वन्यजीव रक्षक सुधीर रिसबुड व नीलेश बापट यांच्याकडून जाणून घेतली. कातळशिल्पाच्या संशोधन कामात त्यांना आवश्यक असणारी मदत करण्याचे आश्वासन दोघांनाही डॉ. राव यांनी दिले. यानंतर त्यांनी रत्नागिरीतील वनविभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक मनिकंडन रामानुजम उपस्थित होते. या बैठकीत रत्नागिरीचे वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांनी जिल्ह्यात वनविभागामार्फत राबवल्या जाणार्‍या योजनांची माहिती दिली. कासव संवर्धन केंद्र मालगुंडची त्यांनी पाहणी केली.  रत्नागिरी जिल्ह्यातील 14 कासव संवर्धन केंद्रा मधून सोडण्यात आलेल्या पिल्लांची माहिती घेतली. कासव संवर्धनाच्या कामाची प्रशंसा करून कौतुक केले.
 मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांनी रत्नागिरी वन विभागातील वन अधिकारी यांची  बैठक घेऊन वन विभागात काम करत असताना येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये माकड, वानर यांच्यापासून शेतकर्‍यांना होणारे नुकसान व शेतकरी करत असलेले उपोषण; बिबट्या, गवा या      प्राण्यांचे माणसावर  होत असणारे हल्ले;   मगर, साप, बिबट्या यांचे दिवसेंदिवस वाढत चाललेले बचाव कार्य  याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वन्यजीव अधिनियम 1972 मधील असणार्‍या तरतुदीमध्ये आवश्यकतेनुसार  बदल करण्याबाबत माहिती दिली. तसेच वनपरिक्षेत्र स्तरावर वन्यप्राणी बचाव करण्यासाठी आवश्यक   वाहन व बचाव करण्यासाठी आवश्यक असणारा निधी याबाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. मागील काही वर्षात मगर व बिबट्यांचे लोकवस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. यावेळी गतीने हालचाली करता याव्यात, यासाठी रत्नागिरी विभागातील वन कर्मचार्‍यांनी मगरी व बिबटे पकडण्यासाठी स्वत: डिझाईन केलेले पिंजरे तयार केले आहेत. या कामाचे वनबलप्रमुखांनी कौतुक केलेच, परंतु संबंधित कर्मचार्‍यांची नावे उत्कृष्ट कामगिरीबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे पेटंट मिळवण्यासाठीही प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
रत्नागिरी वन विभागाने तयार केलेल्या वणवा, कासव सफारी, बिबटे बचाव कार्य, मगर सफारी व वन विभाग रत्नागिरी या विषयावर तयार करण्यात आलेल्या लघुपटाचे वन बल प्रमुख डॉ. राव, मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
या बैठकीसाठीसाठी  विभागीय वनाधिकारी दीपक खाडे,  सचिन निलख, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वैभव बोराटे, राजेश्री कीर उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button