
रत्नागिरी जिल्हा परिषद करणार सौरऊर्जेतून वीजनिर्मिती; राज्यातील पहिलाच प्रकल्प गोळपमध्ये उभारणार
रत्नागिरी : विजबिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी जि. प. प्रशासनाने सौरऊर्जेतून वीज निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे. 1 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प असून राज्यातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील 5 एकर जागेवर हा प्रकल्प होणार आहे. निर्माण होणारी वीज ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना देण्यात येणार आहे. 1 मेगा वॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचा डिपीआर तयार केला असून अंदाजे रक्कम रुपये 7 कोटी खर्च येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीमधील जागेत हा प्रकल्प प्रस्तावित आहे. याबाबतचा सयुक्त सर्व्हे महावितरण, गोळप व जिल्हा परिषदेकडून नोेव्हेंबर महिन्यात झाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा कृषी अधीक्षक अजय शेंडे यांच्याकडून प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 2022 – 23 या आर्थिक वर्षासाठी अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रम जिल्हा परिषद कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व पथदिपांसाठी 11 लाख 80 हजार युनिट्सचा तर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 1 लाख 50 हजार 773 युनिट्सचा वापर होतो. दोन्ही मिळून 13 लाख 50 हजार युनिट्सचा वार्षिक वापर होतो. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेता दोन्हीसाठी 15 लाख 50 हजार युनिट्सची गरज भासणार आहे. हे लक्षात घेऊन सोलर प्रकल्प उभारल्यास 16 ते 17 लाख एवढे युनिट्सची निर्मिती होऊ शकते.