
खेर्डीचे कलाशिक्षक पाटील यांच्या ‘बाहुलीनाट्यातून शिक्षणाला’ फेलोशिप
चिपळूण : सह्याद्रि शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सतीचे कलाशिक्षक टी. एस. पाटील यांच्या ‘बाहुली नाट्यातून आनंदाचे शिक्षण व जीवन शिक्षण’ या उपक्रमाची 2023 – 24 या शैक्षणिक वर्षासाठी फेलोशिपसाठी निवड झाली आहे. नुकतीच ही फेलोशिप त्यांना प्रदान करण्यात आली.
देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटरच्या’ वतीने ‘शरद पवार इन्स्पायर’ची सुरुवात 2021 – 22 पासून करण्यात आली आहे. शिक्षण, कृषी, साहित्य या क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग व उपक्रम करणार्या गुणवंतांना प्रत्येकी 60, 000 -/ हजार रुपये फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला जातो.
बाहुली नाट्यातून वेगवेगळे प्रयोग करून कृतीयुक्त ज्ञानरचनावादावर आधारित आनंददायी शिक्षण कशाप्रकारे देता येईल, यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम पाटील हे राबवत असतात. तसेच या कलेचा वापर त्यांनी कोरोना जनजागृती, स्वच्छता अभियान, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, व्यसनमुक्ती अभियान या विविध विषयांचे समाज प्रबोधन करण्यासाठी केला आहे. दि. 11 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे शरदचंद्र पवार, डॉ. सी. डी. माई , खासदार सुप्रिया सुळे व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पाटील यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली.
या फेलोशिपमधून तयार होणार्या विविध उपक्रमांचा उपयोग संपूर्ण राज्यभर शिक्षण, कृषी, साहित्य क्षेत्रात वापर केला जाणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, सेक्रेटरी महेश महाडिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ चित्रकार – शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, माणिक यादव आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.