मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दौर्यासाठी रत्नागिरी सजू लागली
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात विकासकामांना वेग आला आहे. शहराची रंगरंगोटी, साफसफाई सुरू झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत या कामाचा आढावा घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे 16 डिसेंबर रोजी मंत्री आणि आमदारांसोबत रत्नागिरी दौर्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यामधील दुभाजक रंगवले जात आहेत. दुभाजकांमध्ये असलेली फुलांची झाडे आकारात छाटण्यात आली आहेत. शासकीय कार्यालयांच्या बाहेरील भिंतीसुद्धा सुशोभित केल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर गटारांमधील साचलेला प्लास्टिक पिशव्यांचा आणि बाटल्यांचा खच काढला जात आहे. खराब रस्त्यांची दुरुस्तीही वेगाने केली जात आहे. काही ठिकाणी पॅच मारले जात आहेत. शहरातील इतर ठिकाणी छोट्या-मोठ्या रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. शहरातील बंद पथदीपही दुरुस्त करून ते सुरू करण्यात आले आहेत. नगर परिषदेच्या आवारातील स्वच्छता करून प्रवेशद्वारांवर गेट बसवून भिंतीही स्वच्छ करण्यात आल्या आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे राहिलेले किरकोळ काम येत्या एक -दोन दिवसांत पूर्ण होऊन ते उद्घाटनासाठी सज्ज होणार आहे.