आईवडील नसलेल्या दहा वर्षांच्या मुलीवर बळजबरी करणाऱ्याला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

राजापूर : नात्यातील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणार्‍या तरुणाला पोक्सो विशेष न्यायालयाने शुक्रवारी 20 वर्षे सक्तमजुरी आणि 43 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना जुलै 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडली. या प्रकरणी अनुराग मोतिराम बावकर (वय 30, राहणार राजापूर) याला शिक्षा सुनावण्यात आली. याबाबत पिडीतेच्या मावशीने दिलेल्या तक्रारीनुसार पीडितेच्या आई-वडिलांचा मृत्यू झालेला असल्यामुळे ती वडिलांच्या आईकडे म्हणजेच आजीकडे राहते. आजी बाहेर गेल्यावर अनुराग पीडितेवर कुणाला सांगितलेस तर धमकी देत तिच्यावर वारंवार बळजबरी करत होता.
याबाबत पीडितेने आजीकडे तक्रार करूनही तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान, पीडित मुंबईला आपल्या मावशीकडे गेली होती. तिथून ती परत गावी परतण्यास तयार नव्हती. तेव्हा मावशीने तिच्याकडे याबाबत विचारणा केली असता तिने रडण्यास सुरुवात करुन सर्व हकीगत सांगितली. मावशीने याबाबत मुंबई येथील मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु, घटना राजापूर येथे घडल्याने गुन्हा राजापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तत्पूर्वी मुंबईत पिडीतेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती.
गुन्हा राजापूर पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एल. मौले यांनी तपासाअंती अनुराग बावकर आणि गुन्ह्याचे कृत्य माहीत असूनही पोलिसांकडे तक्रार न दिल्यामुळे पीडितेच्या आजी विरोधात पोक्सो विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पराज शेट्ये यांनी 10 तर आरोपीच्या वतीने 3 साक्षीदार तपासले.
या प्रकरणात दोन्ही पक्षांच्या युक्तीवादाअंती अनुरागचा गुन्हा सिद्ध झाल्याने विशेष न्यायाधीश वैजयंतीमाला ए. राऊत यांनी विविध कलमे तसेच पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून 20 वर्ष सक्तमजुरी आणि 43 हजार 500 रुपये दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली. आजीवरही कलमे लावून दोषी ठरवून 1 हजार रुपये दंड तो न भरल्यास 10 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button